जळकोट : तालुक्यातील सहा पंचायत समिती गणासाठी जळकोट येथील तहसील कार्यालयामध्ये नियंत्रण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, तहसीलदार सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार खरात, गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. जळकोट तालुक्यात पंचायत समितीचे सहा गण आहेत. या सहा गणांपैकी महिलांसाठी तीन गण आरक्षित करण्यात आले आहेत. या सहा गणांपैकी अनुसूचित जातीसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्ग १ तर खुल्या प्रवर्गासाठी तीन जागा सोडण्यात आले आहेत .
जळकोट पंचायत समितीचे गननिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. वांजरवाडा-अनुसूचित जाती (महिला), जगळपूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), मंगरूळ – सर्वसाधारण, माळहिपरगा -सर्वसाधारण, घोणसी- अनुसूचित जाती, अतनूर- सर्वसाधारण (महिला), जळकोट तालुक्यातील पंचायत समिती गण तसेच जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झाले आहे यामुळे आता इच्छुक ख-या अर्थाने मैदानात उतरणार आहेत. या पार पडलेल्या आरक्षणामध्ये काहीजणांसाठी अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडले तर काही इच्छुकांची निराशा झाली. वांजरवाडा जिल्हा परिषद गटातील वांजरवाडा व जगळपूर या दोन्ही पंचायत समिती गणामध्ये महिलांसाठी आरक्षण सुटले आहे. माळहीपरगा जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या दोन पंचायत समिती गणापैकी दोन्ही जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत. आरक्षण सोडत प्रसंगी जळकोट तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.