16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeलातूरशिक्षणाची पंढरीत आता क्रीडा नैपुण्य असलेले खेळाडू निर्माण व्हावेत

शिक्षणाची पंढरीत आता क्रीडा नैपुण्य असलेले खेळाडू निर्माण व्हावेत

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कृषी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि इतर क्षेत्राशी संबंधित विकासकामांना गती देवून जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. लातूर जिल्हा शिक्षणाची पंढरी आहे, आता क्रीडा नैपुण्य असलेले खेळाडू जिल्ह्यात निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण, आरोग्यासह विविध योजनांची जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर कामे विहित कालावधीत व दर्जेदार होण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिका-यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत महाजन बोलत होते. खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज विलासराव देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याच्या विकासासाठी तालुका आणि जिल्हा क्रीडा संकुलात चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी तालुका क्रीडा संकुलाच्या निधीत पाचपट वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील क्रीडा संकुलांमध्ये सुविधा निर्मितीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. या कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून उभारण्यात येणा-या खुल्या व्यायामशाळेत दर्जेदार साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी आणि दफनभूमी असणे आवश्यक असून स्मशानभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमी शेड उभारणीसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये खासगी जमीन खरेदीसाठी राज्यस्तरावर धोरण निश्चित करण्यात येईल, असे पालकमंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. यासाठी एकरकमी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री महाजन यांनी दिले. तसेच शाळांच्या संरक्षण भिंती, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, निजामकालीन शाळांचा विकास योजनेचा त्यांनी आढावा घेतला. चाकूर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या इमारतीची शिक्षणाधिका-यांनी स्वत: पाहणी करून अहवाल सादर करावा. उदगीर तालुक्यातील जळकोट येथील सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह तातडीने सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. वीज हा शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून कृषीपंपांना नियमित वीज पुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. नादुरुस्त वीज रोहित्र त्वरित बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अतिरिक्त ५० वीज रोहीत्रांची खरेदी करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. आवश्यकता असल्यास आणखी वीज रोहीत्रांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री महाजन यावेळी म्हणाले.

लातूर येथे माता व बाल रुग्णालय उभारण्यासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून या रुग्णालयाची इमारत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात उभारण्याची कार्यवाही त्वरित सुरु करावी. तसेच ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रांच्या अपूर्ण इमारती त्वरित पूर्ण कराव्यात. चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या योजनेचा नियोजनपूर्वक वापर करावा, असे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासोबतच प्रमुख महामार्गांच्या कामांसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे ते यावेळी म्हणाले.

खासदार शृंगारे, खासदार निंबाळकर, माजी मंंत्री आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार बनसोडे, आमदार काळे, आमदार कराड, आमदार धीरज देशमुख, आमदार यांनी विविध प्रश्न मांडले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या