शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
पिक विमा द्यावा,गायरानावरील घरे नियमित करावीत, ग्रामीण रुग्णालय सर्व सोयीने सुरू करावे, न्यायालयाला मंजुरी द्यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने दि.६ मार्च पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेतक-यांचा मोठा सहभाग होता. शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेती ओलिताखाली आहे व त्यासाठी वीज आवश्यक आहे. तालुक्यात पाच ३३ केव्ही सब स्टेशन आहेत व त्यासाठी लागणारी वीज १३२ केव्ही हे निलंगा व चाकूर येथे आहे व याचा अंतर निलंगा ३५ ते ४० किलोमीटर व चाकूर पंचवीस ते तीस किलोमीटर आहे त्यामुळे तालुक्यात १३२ सबस्टेशन होणे गरजेचे आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतक-यांना विमा मिळाला नाही. त्या मुळे शेतक-यांत विमा कंपनीबद्दल असंतोष निर्माण आहे. त्यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान मागील वर्षांचा खरीप २०२२ चा पिक विमा त्वरित मंजूर करावा, तालुक्यामध्ये १३२ केव्ही सबस्टेशन मंजूर करावे, धामणगाव येथे ३३ ‘५ सबस्टेशन मंजूर करण्यात यावे, शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व सोयी पुरवण्यात यावे, शिरूर अनंतपाळ येथे ग्रामीण न्यायालय मंजूर करण्यात यावे,शिवपूर येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे काम लवकरात लवकर चालू करावे, प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात सर्वांना समान अनुदान देण्यात यावे, भूकंपानंतर गावा लगत ज्या लोकांनी प्लॉट खरेदी केला त्याची ग्रामपंचायत ८ अ ला नोंद करून शेतक-याच्या सात बारा वरून कमी करण्यात यावे, गायरान जमिनीवर ज्या लोकांची घरे आहेत ते ग्राम पंचायत ८ अ नोंद करण्यात यावे, यासाठी रयत क्रांती संघटनेने एल्गार पुकारले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या मागण्यासाठी दि.६ मार्च पासून रयत क्रांती संघटना शेतक-यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर शिरूर अनंतपाळ येथे विविध मार्गाने आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे यांनी निवेदनात म्हटले आहे.