25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरसंपूर्ण विश्वाला भारतीय संस्कृती प्रेरणादायी

संपूर्ण विश्वाला भारतीय संस्कृती प्रेरणादायी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाला राष्ट्रीय एकात्मतेचा बहुमोल विचार दिला. त्यामुळे भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले. महाराष्ट्र शासन, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई आणि विभागीय शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण), नांदेड विभाग, नांदेड यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे कौमी एकता सप्ताहानिमित्त आयोजित ‘सांस्कृतिक एकता दिवस’ या विषयावरील व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, अमृत महोत्सव समिती समन्वयक डॉ. संजय गवई आणि प्रा. व्यंकट दुडिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारत देश हा खंडप्राय देश आहे. विविधतेतून एकता घडविणारी भारतीय संस्कृती आहे. राष्ट्रीय एकात्मता हा भारतीय संस्कृतीचा मूळ पाया असून भारतीय संस्कृती ही बहुआयामी असल्याचे सांगून डॉ. कटारे म्हणाले की, आपण शेजारच्या राष्ट्रावर सुद्धा प्रेम करतो. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा विचार भारतीय संस्कृतीमध्ये असलेला दिसून येतो. विज्ञान, विवेक आणि सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आपण जीवनामध्ये चैतन्य निर्माण केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले की, भारतीय संस्कृती ही सभ्य आणि सुसंस्कृत आहे. संत ज्ञानेश्वर यांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली. त्यामुळे आपली संस्कृती ही सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचली. त्यामुळे देशामध्ये संस्कृतीचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय गवई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. व्यंकट दुडिले यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास वसावे, डॉ. किरण शिंदे, प्रा. अश्विनी इंद्राळे, बालाजी डावकरे, खंडू देडे आणि भीमाशंकर सुगरे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला व्यवसाय शिक्षण विभाग, समाजकार्य विभाग आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या