लातूर : प्रतिनिधी
मराठीत अस्सल विज्ञानवादी कवितांची रेलचेल आहे. त्यामुळे प्रत्येकांनी शेतकरी मायबापांचे दु:ख समजून घेऊन आपल्या आदर्श भारतीय संस्कृतीची जपवणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी केले. दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या ‘वाय-२० युवातरंग’ वार्षिक स्रेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, उपप्राचार्य डॉ. मिलिंद माने, विद्यार्थी विकास मंडळ प्रा. डॉ. आण्णाराव चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रा. मेघा पंडित, विद्यार्थी विकास मंडळ सदस्य डॉ. कोमल गोमारे, पर्यवेक्षक डॉ. हेमंत वरुडकर, पर्यवेक्षक प्रा. उमाकांत झुंजारे, प्रा. गोपाल अवस्थी, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव, विद्यार्थी सचिव आकाश सावंत, विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा म्हेत्रे व विद्या नागटिळक यांची प्रमुख उपस्थित होती.
भारत हा कृषिप्रधान देश असून येथील संस्कृती ही जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ आहे. या भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्ये, गावमाती आणि कृषिसंस्कृतीची जपवणूक तरुणाईंनी केली पाहिजे. कारण आज बदलत्या काळात शहरी, पाश्चिमात्य संस्कृतीमुळे ग्रामसंस्कृती बदलत चालली आहे. त्यामुळे माणूस आणि माणुसकीची जपवणूक प्रत्येकांनी केली पाहिजे. म्हणूनच कवी भालेराव आपल्या कवितेत म्हणतात, काट्याकुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, आज शेतकरी मायबापांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे संघर्षमय शेतक-यांनी आत्महत्या न करता आशावादी जीवन जगले पाहिजे. शेतक-यांच्या मुला-मुलींनी भरपूर शिकले पाहिजे. म्हणूनच ते आपल्या कवितेत म्हणतात की, शिक बाबा शिक, लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक अशा पद्धतीने कविता हे भावना अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे.कवितेचा आधार हा प्रतिभा व कल्पनाशक्ती असतो तर विज्ञानाचा आधार हा प्रयोग आणि निष्कर्ष असतो. असे असले तरी विज्ञान व कवितेचे वावडे नाही.
यावेळी विद्यार्थी सचिव आकाश सावंत यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी ओमकार घार या विद्यार्थ्याने कवी इंद्रजित भालेराव यांचे काढलेले छायाचित्र त्यांना भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेंद्र स्वामी यांनी तर आभार विद्या नागटिळक यांनी मानले. याप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.