रेणापूर : प्रतिनिधी
निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कमी पाऊस तर कधी जास्त पाऊस यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडत होता. यावर्षी बळीराजावर गोगल गायीचे संकट आले असून सोयाबीनची कोवळे मोड कुरतडून वावरेच्या वावरे उद्ध्वस्त करीत आहेत. शासन व प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.
रेणापूर तालुक्यात जूनच्या मध्यंतरी चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांनी काही दिवसांत पेरण्या उरकून घेतल्या. पाऊस वेळेवर पडत गेल्याने सोयाबीनची उगवणही चांगली झाली. यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत असताना अचानकच सोयाबीन पीकांवर गोगल गायींचा उपद्रव झाल्याचे दिसून आले. यातच गेल्या तीन- चार दिवसांत सतत पाऊस असल्यामुळे गोगलगायींचा कसा बंदोबस्त करावा हे तालुक्यातील शेतक-यांसमोर यंदा हे नविनच संकट उभे टाकले आहे. या गोगलगायी उगवलेल्या सोयाबीनच्या मोडांवर हल्ला चढवित असून वावरेच्या वावरे सोयाबीनची मोडे कुरतडून उद्ध्ववस्त करीत आहेत. तेव्हा शासन व प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.
शेतक-यांना सरसकट मदत करावी
शेतात जिकडे बघेल तिकडे गोगलगायी दिसत आहेत. या गोगल गायीमुळे बळीराजाची झोप उडाली. गोगल गायींचा बंदोबस्त कसा करायचा पिके उद्ध्ववस्त करीत आहेत. शासन व प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांला सरसकट मदत करावी.
-माणिकराव सोमवंशी, चेअरमन -रेणुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. रेणापूर