लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या द्वितीय पंचवार्षिक निवडणुकीचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. महानगरपालिकेने पाठविलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला राज्य निवडणुक आयोगाने मंजुरी दिली आहे. या सदंर्भात सोमवार दि. १३ जून रोजी अधिसूचना जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाची निवडणुक लढवून इच्छीणा-या इच्छुकांमध्ये १३ जूनची उत्सूकता आहे.
लातूर शहर महानगरपालिकेची मुदत दि. २१ मे २०२२ रोजी संपली. सध्या महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त अमन मित्तल काम पाहात आहेत. आयुक्त अमन मित्तल यांनी यापुर्वीच राज्य निवडणुक आयोगाला लातूर शहराचा प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला आयोगाने मंजुरी दिली आहे. दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाचा विषय समोर आला होता. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशनमध्ये दि. १९ जानेवारी २०२२ व ४ मे २०२२ रोजी झालेल्या आदेशानुसार शासनास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरीता जागा राखून ठेवण्यासाठी त्रिस्तरीय चाचणी पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यानूसार शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही सुरु आहे, मात्र त्यानूसार कार्यवाही पूर्ण होऊन नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरीता किती प्रमाणात जागा राखून ठेवाव्यात याबाबत शिफारशी प्राप्त होण्यास अथवा त्यानूसार योग्य तो निर्णय घेण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचे कामकाज विहीत कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणुक प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्याचा टप्पा तत्पूर्वी पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रथम निवडणुक प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करुन त्यावरील हरकती व सूचना प्राप्त करुन सुनावणीची प्रक्रिया पुर्ण करावी, असे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीकरीता निवडणुक प्रभागांच्या सीमा दर्शविारी प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागविणे, त्यावर सूनावणी घेण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यानूसार दि. १३ जूनपासून ते ८ जुलैपर्यंत हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.