19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरवेळ नेमका कुठे घालवावा लोकांना कळत नाही हे खरे दुर्दैव

वेळ नेमका कुठे घालवावा लोकांना कळत नाही हे खरे दुर्दैव

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही आपला अमूल्य वेळ, कुठे, कसा घालवावा हे कळत नाही. वास्तविक पाहता हेच आपल्या देशाचे खरे दुर्दैव असल्याची खंत ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी व्यक्त केली. लातूर येथील पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शारदोत्सव व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प ‘चला हवा येऊ द्या’ फेम लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयावर गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्याख्यानमालेचे सचिव प्रकाश घादगिने हे होते. या व्याख्यानाचे प्रायोजक बन्सल क्लासेस प्रा. लि. लातूर, उस्मानाबाद जनता सहकारी बँक, लि. लातूर व लातूर मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लातूर हे होते. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात अरविंद जगताप यांनी छोट्या, छोट्या गोष्टींना आपण रोजच्या धावपळीमध्ये फारसे महत्व देत नाही, त्याकडे सहजगत्या दुर्लक्ष करतो, मात्र त्याच गोष्टी फार काही शिकवून जातात,असे सांगितले. अशा अनेक छोट्या गोष्टींची त्यांनी उदाहरणेही प्रस्तुत केली.

मुंबईतील प्रत्येक अपार्टमेंटला रीतसर परवानगी घेऊन प्रत्येक फ्लॅटमध्ये जाऊन तेथील टॉयलेट – बाथरुम, बेसिनच्या नळांची सूक्ष्म पाहणी करून लिकेज आढळल्यास स्वत: सोबत नेलेल्या प्लम्बरकडून ते तात्काळ दुरुस्त करून देणा-या अमित जोगी नामक अवलियाची गोष्ट त्यांनी सांगितली. असे करताना ते कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीची अपेक्षा बाळगत नाहीत. आठवड्यातून दोन दिवस ते या उपक्रमाला देतात. हे काम जरी छोटे वाटत असले तरी त्यांनी आतापर्यंत एका धरणात साठवले जाऊ शकेल एवढे पाणी वाचवल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. हे काम किती छोटे दिसत असले तरी असामान्य आहे, याची सत्यता पटवून दिली.

माकडाचा खेळ करणारा मदारी आणि कार्यकर्त्यांना वापरुन घेणारा राजकीय पक्षाचा नेता यांच्याविषयीची एक छोटी गोष्टही जगताप यांनी सांगितली. आपले पोट भरणा-या माकडाला खेळ झाल्यावर मदारी डोक्यावर उचलून दुसरीकडे नेतो. राजकारणी मात्र आपल्या इशा-यावर नाचणा-या कार्यकर्त्यांना आपल्या घराच्या आतही घेत नाही. यावरून आपण कोणाशी, कधी कसे वागावे याचा धडा मिळतो, पण लोकांना ते कळत नाही. आपल्या देशात आजपर्यंत एकही राजकीय पक्षाच्या सभेत सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा, भाष्य झाल्याचे दिसून येत नाही. तरीही लोक आपली सारी कामे सोडून सभेला गर्दी करतात. त्यावर आपला वेळ खर्ची घालून विनाकारण चर्चा करतात. त्यामुळे साध्य होते तरी काय ? ही गोष्ट अजूनही आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही, हेच खरे देशाचे दुर्दैव असल्याचे त्यांनी नमूद केले. छोट्या, छोट्या गोष्टीतून उपाय काढणे म्हणजेच गोष्ट छोटी डोंगराएवढी असते, असे त्यांनी बोलून दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल गालिब शेख यांनी तर आभार प्रदर्शन आदित्य कुलकर्णी यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या