जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात सतत तीन दिवस झाले पडणा-या रिमझिम पावसामुळे तालुका हा ओला चिंब झाला आहे. सलग तीन दिवसापासून तालुक्यातील जनतेला सूर्यदर्शन झाले नाही. या सतत पडणा-या पावसामुळे व सूर्यदर्शन न होण्यामुळे पिकांचा वाढीवर परिणाम होण्याची शक्यता शेतक-याकडून व्यक्त केली जात आहे.
जळकोट तालुक्यात सुरुवातीच्या पाण्यावर तालुक्यातील शेतक-यांनी पेरण्या उरकल्या होत्या. यानंतर काही शेतक-यांचे बियाणे न उगवल्यामुळे अशा शेतक-यांना पुन्हा पैसे खर्च करून दुपार पेरणी करावी लागली. काही ठिकाणी पीक जोमात आले आहे. तर काही ठिकाणचे पीक अति पावसाने जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळकोट तालुक्यात जळकोट मंडळामध्ये गत तीन ते चार दिवसापासून सलग पाऊस पडत असल्यामुळे , जमिनीत खूप मोठया प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे.
अनेक हलक्या जमिनीमध्ये मोठया प्रमाणात पाणी साचले होते. असाच पाऊस सुरू राहिला तर कापसासह अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जमिनीमध्ये जास्त पाऊस झाले तर कोवळी पिके उन-मळून जातात. जळकोट मंडळात दि. आठ जुलै रोजी ३३ मिलिमीटर तर घोणशी मंडळात २२ मीलीमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत तालुक्यात ३०३ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.
पाखंडेवाडीकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद
जळकोट पासून जवळ असलेल्या पाखंडेवाडीकडे जाणा-या नदीवर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे जवळपास दोन ते तीन तास वाहतूक ठप्प होती. येथील नागरिकांना तीन तास एका बाजूला थांबून राहावे लागले. या ठिकाणच्या पुलाची उंची अतिशय कमी असल्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी पुलावरून पाणी जात आहे. यामुळे या ठिकाणी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी देखील गावक-यांनी केली आहे.