35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeलातूरभक्तांच्या नवसाला पावणारी खुर्दळीची जनमाता देवी

भक्तांच्या नवसाला पावणारी खुर्दळीची जनमाता देवी

एकमत ऑनलाईन

चाकूर : खुर्दळी (ता.चाकूर) येथे जनमाता (तांदळाई) देवी मंदिरात घटस्थापना करण्यात आलीे. या प्रसंगी पुजारी आणि विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकी मिरवणूक व इतर धार्मिक कार्यक्रम या वर्षी कोरोना या जागतीक महामारीमुळे रद्द करण्यात आले होते. चाकूर तालुक्याच्या ठिकाणापासून पश्चिमेस सहा किलोमीटर अंतरावर नऊशे ते हजार उंबरठयांचे खुर्दळी हे गाव आहे. या गावाची शासनाच्या काही विभागात खुर्दळी तर काही विभागात हाळी (खुर्द) अशी नोंद आहे. गावाच्या उत्तरेला बालाघाट डोंगररांगेच्या कुशीत नदी किनारी वृक्षांच्या छायेत निसर्गरम्य परिसरात पुर्वाभिमुख असलेली जगनमाता देवी भक्तांच्या नवसाला पावणारी, जनमाता देवी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.

जनमाता देवी स्वयंभू असून, देवीचे मुळ ठाणे बोधन (जि.निजामाबाद, आंध्रप्रदेश) येथील असल्याची आख्यायिका पिढयानुपिढया सांगितली जाते. मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूस स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र तिर्थ (कल्लोळ) आहेत, तर पश्चिमेस अखंड वाहणारी छोटी नदी आहे. पुर्वीच्या काळी दळण-वळणांची साधणे नसल्यामुळे व्यापारी माल वाहतुकीसाठी उंट, घोडे, गाढव, बैल, रेडा आदी पाळीव प्राण्यांचा वापर करत. आंध्रप्रदेशातील माल सोलापूरकडे घेऊन जाताना खुर्दळी येथे नदी किनारी, वृक्षांच्या छायेत व्यापारी मुक्काम करीत असत. असेच एके दिवशी काही व्यापारी उंटावरून तांदळाच्या गोण्या (पोते) घेऊन जाताना खुर्दळी येथे मुक्कामी थांबले.

दुस-या दिवशी पुढे जाण्यास निघाले असता, उंटाच्या पाठीवर गोण्या ठेवत असताना त्यातील एक गोणी उचलत नव्हती. त्यामुळे व्यापा-यांनी गोणी सोडून तांदूळ बाहेर काढला असता त्यामध्ये सुपारीच्या आकाराएवढी देवीची मुर्ती निघाली. देवीची येथेच राहण्याची ईच्छा असल्याचे समजून व्यापा-यांनी या ठिकाणी देवीच्या (तांदळाई) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली. सुपारीच्या आकाराची मुर्ती कालांतराने पुढे स्वयंभू वाढत जाऊन मोठी झाल्याचे भाविक-भक्त सांगतात.

पुर्वी देवीचे हेमाडपंथी मंदिर होते. परंतु, कालांतराने ते मोडकळीला आल्याने काही वर्षापूर्वी गावक-यांनी देवीचे मुळस्थान न बदलता मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्यानंतर शासकीय निकषांनुसार धर्मादाय आयुक्तांकडे जनमाता आई देवस्थान विश्वस्त मंडळ या नावाने नोंदणी केली. नवसाला पावणारी आंबामाय अशी सर्वत्र ख्याती असलेल्या देवीची शासनाने दखल घेऊन या मंदिरास तिर्थक्षेत्राचा दर्जा बहाल केला आहे. तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सिमेंट रस्ता व भक्त निवासाचे काम झाले आहे. गावक-यांनी यशवंत ग्रामसमृध्दी योजनेच्या माध्यमातून मोठा सभामंडप बांधला आहे. पाणी, वीज, अत्याधुनिक भक्त निवास अशा विविध सुविधा येथे उपलब्ध आहेत.

शासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे
नवरात्री उत्सवात दरवर्षी प्रमाणे कुठलेही कार्यक्रम यावर्षी होणार नाहीत. अन्नछत्र चालवले जाणार नाही. अन्नदात्यांनी आर्थिक रुपात देणगी द्यावी. शासनाने अद्याप ही मंदीर उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भाविक भक्तांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन विस्वस्त तथा तंटामुक्त समिती उपाध्यक्ष शरद पाटील यांनी केले आहे.

हेलिकॉप्टर अपघातातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद थोडक्यात बचावले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या