लातूर : प्रतिनिधी
ग्राम राजस्व अभियानातंर्गत लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील मिळकतींच्या नोंदी, वारस नोंदी घेण्यात येणार आहेत. या बरोबरच ग्रामपंचायत नमूना नंबर ८ वरील मिळकतींची नोंदणी पती-पत्नी यांच्या संयुक्त नावे करण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. ग्रामपंचायत नमूना नंबर ८ वर पूर्वी फक्त पतीचेच नाव असायचे मात्र आता ग्राम राजस्व अभियानामुळे नमूना नंबर ८ वर पत्नीचेही नाव नोंदवले जाणार आहे. त्यामुळे महिलांचाही सन्मान वाढणार आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत प्रशासन अधिक लोका-भिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायती मध्ये ग्राम राजस्व अभियान ग्रामपंचायत स्तरावर २५ जानेवारी २०२४ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत हद्दीमध्ये वारस नोंदी व मिळकत कराच्या नोंदी, तसेच मिळकती पती पत्नी यांच्या संयुक्त नोंदी करणे, नोंदीबाबत अर्ज प्राप्त झाल्या नंतर अर्जाची छानणी करणे व अपूर्ण दस्तऐवजाबाबत संबंधितांना लेखी त्रुटींची माहिती कळविण्यात येणार आहे. तसेच पात्र नोंदीबाबत अर्जानुसार संबंधितांचे जाबजबाब नोंदविले जाणार आहेत. सदर मिळकतीला समक्ष भेट देऊन सरपंच, ग्रामसेवक स्थळपाहणी करणार आहेत. कोणाच्या हरकती, सुचना असतील तर त्या मागविणे, अपुर्ण दस्ताऐवजाबाबत कळविण्यात आलेल्या त्रुटींची पुर्तता केली जाणार आहे. तसेच ग्राम पंचायतीचे सर्व कर मार्च अखेर १०० टक्के वसुल करण्याकरिता गरज असल्यास ग्रामपंचायतस्तरावर मोहिम घेण्याची सुचना केली आहे.