जळकोट : जळकोट तालुक्यामध्ये गत सहा दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव शंभर टक्के भरले आहेत तर करंजी व रावणकोळा साठवन तलाव शंभर टक्के भरले आहेत. यामुळे या भागातील पाणी प्रश्न मिटला आहे. जळकोट तालुक्यामध्ये जवळपास १५ च्या वर साठवण तलाव आहेत. या साठवन तलावामुळे तालुक्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठवण तलाव मंजूर केले होते. जळकोट तालुका हा जरी डोंगरी तालुका असला तरी या साठवण तलावांमुळे जळकोट तालुक्यात नंदनवन निर्माण झाले आहे . याच साठवण तलावामुळे जळकोट तालुक्यात जवळपास १६०० हेक्टर क्षेत्रावर शेतक-यांंनी ऊस लागवड केली आहे.
जळकोट तालुक्यातील अनेक गावांचा प्रश्न या साठवंतलावर अवलंबून आहे. तालुक्यातील अनेक साठवण तलावे परतीच्या पावसावर पूर्णपणे भरत असतात परंतु यावर्षी मात्र अनेक साठवण तलावे जुलै महिन्यातच भरत आली आहेत. तालुक्यातील रावण कोळा तसेच करंजी साठवण तलाव पूर्णपणे क्षमतेने भरलेला आहे. यामुळे या भागातील पाणी प्रश्न मिटला आहे. या सोबतच जळकोट तालुक्यातील अनेक साठवण तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत.