जळकोट : जळकोट हे तालुक्याचे ठिकाण आहे. तालुका निर्मितीला २३ वर्षे पूर्ण होत आहेत. असे असले तरी जळकोट येतील बस स्थानकामध्ये अद्यापही शासनाच्या वतीने जेवढ्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या तेवढ्या सुविधा मिळालेल्या नाहीत . आजही बस स्थानकामध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. यामुळे अनेक अडचणीचा सामना रात्री मुक्काम करणा-या चालक व वाहकांना करावा लागत आहे .
तालुक्याचे बसस्थानक हे तालुक्याला शोभणारे असणे गरजेचे आहे परंतु राजकीय नेते मंडळींनी वेळच्या वेळी लक्ष न दिल्यामुळे आज जळकोट बस स्थानकाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. ग्रामीण भागातील बस स्थानकापेक्षा बिकट अवस्था झाली आहे. जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळी कंधार आगार , अहमदपूर आगार , तसेच उदगीर आगाराच्या अनेक बसेस मुक्कामी येतात . या बसच्या चालक आणि वाहकांना देखील याच ठिकाणी मुक्काम करावा लागतो . परंतु बस स्थानकामध्ये चालक व वाहकांना मुक्काम करण्याची कुठलीही सोयी सुविधा नाही.
चालक व वाहकांना रात्री झोपण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र रूमची आवश्कता होती परंतु आजही या ठिकाणी स्वतंत्र रूमची व्यवस्था करण्यात आली नाही तसेच बसस्थानकामध्ये कुठेही फॅनची सोय नाही. यामुळे मुक्कामी आलेल्या चालक तसेच वाहकांना बस मध्येच झोपावे लागत आहे. यासोबतच जळकोट बस स्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. येथे मुक्काम करणा-या चालक व वाहकांना बाहेरून पाणी आणून प्यावे लागत आहे. परिवहन विभागाने निदान जळकोट येथील बसस्थानकामध्ये मुक्काम करणा-या चालक व वाहकासाठी व्यवस्था करावी, अशी मागणीही आता होत आहे.