21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरलातूर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे

लातूर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे

एकमत ऑनलाईन

लातूर : गत चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे नुकतीच पेरणी झालेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे, शिवाय पडझड व इतर दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, पाणी साचलेल्या भागात पाहणी करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. १३ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाला केल्या.

लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पडझडीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सखल भागात पाणी साचून खरिप पिकाचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून जिल्ह्यातील सध्य परिस्थितीबाबत चर्चा केली. दरम्यान त्यांनी जिल्हाधिका-यांकडून एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आ. देशमुख यांना सध्या पडणारा पाऊस जोराचा नसला तरी काल दिवसभरात काही ठिकाणी ३९ ते ८० मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती दिली. यामुळे नदी-नाले प्रवाही झाले आहेत. पाऊस असाच चालू राहिला तर पूर परिस्थिती उद्भवू शकते ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्जत ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी आ. देशमुख यांनी दिली.

बॅरेजेसचे पाणी थांबवू नका
सततच्या पावसामुळे जिल्हात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावक-यांना सतर्क करावे, बॅरेजमध्ये पाणी थांबून शेत जमिनींचे नुकसान होणार नाही यासाठी पाटबंधारे विभागाला सतर्क राहण्यास सांगावे आदी सूचनाही आ. देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या असून याबाबत सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

गोगल गायीच्या प्रादुर्भावाबाबत माहिती घ्या
गोगल गायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आ. देशमुख यांच्याकडे आल्या आहेत, याबाबत माहिती घेऊन त्याचे पंचनामे करावेत अशी सूचना त्यानी जिल्हा प्रशासनाला केली आहे, कृषी विभागाकडून यासंदर्भात माहिती मागवण्यात आली असल्याचे जिल्हाधिका-यांनी आमदार देशमुख यांना सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या