लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात औरंगाबादनंतर सर्वाधिक वीज पडणारा वीज प्रवण जिल्हा म्हणून लातूरचा क्रमांक लागतो. लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक उंचावर असलेला तालुका लातूर आहे. त्यामुळे वीज पडण्याचे अधिकचे प्रमाण लातूर तालुक्यात आहे. वीज पडताना उंचवट्यावर पडते, त्यात खुले मैदान, झाड आणि पाण्याच्या जवळ पडते. वीजा लवताना शक्यतो अर्थिंग रोध करणा-या वस्तूवर बसा, धातू जवळ ठेवू नका आणि बंदिस्त जागेत बसा. ही सगळी अत्यंत महत्वपुर्ण माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपविभागाचे व्यवस्थापन शास्त्राचे प्रा. प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या मान्सून आढावा बैठकीपूर्वी झालेल्या सादरीकरणात दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपविभागाचे व्यवस्थापन शास्त्र यांच्याकडून झालेल्या अभ्यासाचे ते सादरीकरण करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. या अभ्यासगटाने केलेल्या अभ्यासानुसार लातूर जिल्ह्यात सर्वाधिक दुर्घटना लातूर तालुक्यात झाल्या आहेत. लातूर तालुका इतर तालुक्यापेक्षा अधिक उंचावर आहे. वीज पडण्याच्या दुर्घटना दुपारी ४ ते सायंकाळी ६ या कालावधीत झालेल्या आहेत. सर्वाधिक दुर्घटना खुल्या मैदानावर, झाडा खाली आणि पाण्याच्या जवळ झालेल्या आहेत.
उभं राहिलेल्या लोकांवर अधिक वीज पडल्या आहेत. एका गावी झाडाखाली काही महिला थांबल्या होत्या. एक लहान बाळाला पावसाची ओल लागू नये म्हणून खाली लाकडाची फळी टाकून वर टोपली टाकून झोपवलेलं होतं त्या बाळाला काही झाले नाही इतर स्त्रियांवर वीज कोसळली. या वीज पडून मृत्यू पावलेल्यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असून मृत्यू झालेल्या ९५ टक्के लोकांचा विमा उतरवलेला नव्हता, अशी माहिती डॉ. पाटील यांनी या सादरीकरणात दिली. या सर्व गोष्टीचे लोक शिक्षण होण्यासाठी शाळेची एक भिंतीवर हे सगळं पेंट करण्याचा सल्लाही यावेळी डॉ. प्रमोद पाटील यांनी दिला. अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी या सादरीकरणाच्या माहितीचे पत्रक काढून लोकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही शासकीय यंत्रणेला दिल्या.