लातूर :जवळपास साडे सहा महिन्यांच्या कालावधीनंतर लातूर-मुंबई ही रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होत असून यामुळे लातूर परिसरातील प्रवाशांची मोठी सोय होत आहे. असे असले तरी प्रवासादरम्यान काही नियम पाळावे लागणार असून यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केले आहे
निजाम शेख यांनी म्हटले आहे की,आता रेल्वेसेवा सुरू होत असली तरी त्यासाठी काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. अद्याप केंद्रशासनाने रेल्वे वाहतुकीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वतीने चालविण्यात येणारी ही गाडी महाराष्ट्राच्या हद्दीतच प्रवाशांची वाहतूक करेल, परराज्यात जाणार नाही.त्यामुळे सध्या लातूरहून मुंबई व परत मुंबई-लातूर अशीच ही गाडी धावणार आहे, अशी माहितीही शेख यांनी दिली.
प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येणार असला तरी प्रवासादरम्यान प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे.प्रत्येक प्रवाशाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप असणे आवश्यक असून रेल्वेस्थानकावर प्रवास करतानाच थर्मल स्कॅनरने त्याला ताप आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांना ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. यापुढील काळात प्रत्येक बर्थसाठी आरक्षण बंधनकारक असून वेटिंगवर असणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत प्रवेश मिळणार नाही. सामान्य डब्यातून प्रवास करण्यासाठीही आरक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही निजाम शेख यांनी केले आहे.
संभाजी ब्रिगेडचे कौठा येथे रास्तारोको