26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरकोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लातूर मनपाने ‘धारावी मॉडेल’ राबवावा

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लातूर मनपाने ‘धारावी मॉडेल’ राबवावा

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरात दिवसेंदिवस कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे. त्याअनुषंगाने लातूर महापालिकेने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘धारावी मॉडेल’ कशा पद्धतीने येथे राबवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित लातूर महापालिका क्षेत्रात कोविड-१९ चा प्रादुर्भाव बाबतच्या उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. दीपक मठपती, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ, परिवहन सभापती मंगेश बिराजदार, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, डॉ. गिरीश ठाकूर, महापालिकेचे उपायुक्त वसुधा फड, उपायुक्त सुंदर बोंदर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, धारावीमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांची लातूर महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी करण्याबाबत महापालिकेने प्रयत्न करावेत व येथील कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी करावा. याकरिता हॉटस्पॉट ठरत असलेल्या भागातील सर्व लोकांची एकाच दिवशी टेस्ट करणे तसेच त्या लोकांना एखाद्या ठिकाणी शिफ्ट करुन चौदा दिवस क्वॉरंटाईन करणे उपाय योजना राबविण्याबाबत चाचपणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
लातूर शहरात कोविडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे हे लक्षात घेऊन लातूर महापालिकेने किमान १००० बेडची उपलब्धता करुन ठेवावी.

तसेच लातूर शहरातील सर्व खाजगी रुग्णालयातील बेड ना आॅक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही करुन घ्यावी. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका व्यतिरिक्त अधिकच्या सहा रुग्णवाहिकांची तयारी ठेवावी व शहरातील कंटेन्मेंट झोनसाठी खाजगी सुरक्षा रक्षक उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. लातूर शहरातील स्त्री रुग्णालय हे पूर्णपणे कोविड केअर सेंटर करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठता व महापौर यांनी संयुक्तपणे पाहणी करावी. लातूर महापालिकेला मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट करण्यासाठी रॅपिड किट्स उपलब्ध करुन दिले जातील तसेच महापालिकेने कोविड केअर सेंटरसाठी एखादे मोठे मंगल कार्यालयची पाहणी करावी.

त्याप्रमाणेच जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धतेबाबत डॅशबोर्ड नियमितपणे अपडेट करत जावा, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. तसेच सर्व शासकीय रुग्णालये, सर्व
कोविड केअर सेंटर व लातूर शहरात  स्वच्छता व साफसफाई चांगली ठेवण्याबाबतची कार्यवाही करावी असेही त्यांनी निर्देशित केले.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर महापालिकेच्या हद्दीतील कन्टेन्ट झोनची माहिती दिली तसेच प्रशासनाच्या वतीने लातूर महापालिकेला किमान एक लाख रॅपिड टेस्ट किट उपलब्ध करुन द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. प्रारंभी महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी महापालिका प्रशासनामार्फत लातूर शहरात राबविण्यात येत असलेल्या कोरोना उपाययोजनांची माहिती दिली व पुढील काळात प्रशासनाच्या तयारी विषयी ही त्यांनी सांगितले.

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात किमान १०० बेडस् राखीव ठेवावे
शहरातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील किमान १०० बेडस कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाने तात्काळ करावी. त्याप्रमाणेच लातूर शहरात बाहेरुन येणा-या लोकांसाठी त्यांना स्वत:हून कोरोना टेस्ट करावयाची असेल तर ही सुविधा एखाद्या पेट्रोल पंप या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

‘चेस दी व्हायरस’ या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मास टेस्टिंग करावी
लातूर महापालिकेने सर्व १८ प्रभागांमध्ये एक स्वॅब कलेक्शन सेंटर निर्माण करावे व त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य कर्मचारी नेमून त्या प्रभागातील लोकांचे स्वॅब घेण्याची व्यवस्था करावी. त्याप्रमाणेच महापालिकेने चेस दी वायरस या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मास टेस्टिंग करावी. महापालिकेने प्रभाग निहाय टास्क फोर्सची निर्मिती करावी व या प्रभागाची जबाबदारीसाठी अधिका-यांच्या टीम तयार कराव्यात. या प्रभागात कोविडचा उपाययोजना राबवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

Read More  तंत्रज्ञान : झिरो प्रायव्हसी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या