18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरउजनीच्या पाण्यासाठी लातूर मनपा हमीपत्र देणार

उजनीच्या पाण्यासाठी लातूर मनपा हमीपत्र देणार

एकमत ऑनलाईन

लातूर : उजनीचे पाणी धनेगाव धरणात आणण्यासाठी केेंद्र तथा राज्य शासनाच्या प्रचलीत योजनेनूसार शासनाच्या योजनेतील अटी व शर्तीनूसार लातूर शहर महानगरपालिका हमीपत्र देणार असल्याचा महत्वपूर्ण ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच इतरही महत्वपूर्ण विषयांवर सांगोपांग चर्चा होऊन ते विषय मंजूर करण्यात आले.

लातूर शहर महानगरपालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला उजनीच्या पाण्याचा विषय सभागृहापूढे आला तेव्हा सदस्यांनी या विषयावर चर्चा केली व या विषयास मंजूरी दिली. उजनीपासून धनेगावपर्यंत पाणी येण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ज्या अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यासाठी हमीपत्र देणे, उजनीच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे पाणीपट्टीत कसलीही वाढ होणार नाही. उजनीचे पाणी धनेगाव धरणात आणले तरी ते पाणी केवळ टंचाई परिस्थितीतच वापरले जाणार, त्यामुळे पाणी सुरु होईल त्यावेळी त्या संदर्भाने इतर निर्णय घेतले जातील, असा ठराव घेण्यात आला.

या सभेत मागील सर्वसाधरण सभा दि. १२ फे बु्रवारी २०२१ चे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत शिफारस करणे, शहरातील गावभागातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था पुनर्विकास करण्याकरीता शासनास प्रस्ताव पाठविणे, बॉम्बे नर्सींग होम नुतणीकरण करणे, दिव्यांगांना मागण्यात येणारे जी. एस. टी. बील व कोटेशन रद्द करणे, लातूर शहरास ई वाहने वापर चालना देणे, शहरालगत वसत्यांमध्ये व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथदिवे व सुविधा पुरविणे, कुष्ठरोगी यांना देण्यात येणा-या निर्वाह भत्यामध्ये वाढ करणे आदी विषयांवर चर्चा करुन ते विषय मंजूर करण्यात आले. विषय पत्रिकेवर एकुण ३४ विषय आहेत. त्यामुळे या विषयांवर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती.

महिलांना सीटीबस प्रवास मोफत
महिलांना मोफत सीटी बस सेवा उपलब्ध करुन देण्याबाबतचा महत्वपूर्ण ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. महिला प्रवाशांना महानगरपालिका परिवहन विभागच्या वतीने स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. सीटीबसवर महिला चालक व वाहक असावेत, अशीही चर्चा सभागृहात झाली.

‘त्या’ नोटीसा रद्द
शहरातील विविध ठिकाणी बांधकाम नियमितकरण करण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. अनेक नोटीसांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या आहेत. तसेच ३०-४० वर्षांपुवीच्या इमारतींनादेखील नोटीस देण्यात आलेल्या आहेत. सर्वसाधारण सभेत या नोटीसा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला. आता सर्वेअरमार्फत नवीन सर्वे करुन त्याआधारेच नव्या नोटीसा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या