26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरवाढता कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर महापालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न

वाढता कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर महापालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो रोखण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

मागच्या काही दिवसात लातूर शहरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी लातूर महानगरपालिकेने सर्वच आघाड्यांवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. शहरात सध्या २३० अ‍ॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन असून त्या ठिकाणी शिफ्टनुसार कर्मचारी नियुक्त करावे लागत आहेत. यात दररोज आणखीन कंटेनमेंट झोनची संख्या वाढत असून त्या ठिकाणी नियुक्त करण्यासाठी कर्मचा-यांची कमतरता भासत आहे. परिणामी आहे त्या यंत्रणेवरील ताण वाढत आहे. याशिवाय शहरात सध्या समाज कल्याण वस्तीगृह आणि पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन या दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून आणखी अशा दोन कोविड केअर सेंटरची उभारणी प्रस्तावित आहे.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शहरात रॅपीड अँटीजन टेस्टची संख्याही वाढवण्यात येत आहे, त्यासाठी रॅपिड अँटीजन किट्स उपलब्ध झाले आहेत, याचे झोननिहाय टेस्टिंग सेंटर उभारावयाचे आहेत, परंतु प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी याकामी अडचणी येत आहेत.

महापालिकेची मनुष्यबळाची अडचण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महापालिकेला मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. या संदर्भाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी महापालिकेकडून प्रस्ताव मागविला असून आयुक्त देविदास टेकाळे यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त होतात आवश्यकतेनुसार मनुष्यबळ पुरवण्यात येईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

लातूर रेल्वे स्थानकावर कोविड सेंटर उभारावे
मागील पाच महिन्यांपासून दोन रेल्वे गाड्या लातूर रेल्वे स्थानकावर उभ्या आहेत. लातुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता उभ्या असणा-या या रेल्वे गाड्यांचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे. पंतप्रधान सहाय्यता निधीतून त्यासाठी १०० व्हेंटिलेटर देण्यात यावेत ,अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक संजीव मित्तल यांना पाठवली आहेत. निवेदनात म्हटले आहे की, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर २२ मार्चपासून रेल्वेसेवा थांबवण्यात आली. तेव्हापासून दोन रेल्वे गाड्या लातूरच्या रेल्वेस्थानकावर उभ्या आहेत. देशात वाढता प्रादुर्भाव पाहता रेल्वेने तत्परता दाखवत आपल्या अनेक कोचचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर केलेले आहे. आता लातूरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या पाहता शासकीय रुग्णालय तसेच शहरातील खाजगी रुग्णालयातील यंत्रणेवर ताण येत आहे. लातूरच्या रेल्वेस्थानकावर दोन गाड्यांचे मिळून एकूण ३६ कोच उपलब्ध आहेत. अडचणीच्या काळात या कोचचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे.

Read More  यशवंत विद्यालयाचा ‘एक धागा कोरोना योद्धासाठी’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या