लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेअंतर्गत शहरातील गांधी चौकातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जुलै २०२० मध्ये ‘डेडीकेटेड कोरोना केअर सेंटर’ सुरु करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत या डेडीकेटेड कोरोना केअर सेंटरमध्ये ४ हजार ४७० कोरोनाबाधित रुग्णांना भरती करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यापैकी ४ हजार ३१६ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले. गेल्या तीन महिन्यांत लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने कोरोनाबाधित रुग्णांचे १०० कोटी रुपये वाचवले असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगीतले.
लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आज गांधी चौकात ज्या जागेवर उभे आहे, त्या जागेचा एक उज्ज्वल असा ईतिहास आहे. या जागेवर २७ सप्टेंबर १९५२ रोजी कस्तूरबा गांधी शासकीय रुग्णालय सुरु करण्यात आले होते. विशेष म्हणजे या रुग्णालयाचा शुभारंभ देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते झालेला होता. सलग ५६ वर्षे रुग्णसेवा देणा-या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयाचे सन २००८ मध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेला हस्तांतरीत करण्यात आले.
त्यामुळे या इमारतीत काही काळ परिचारीका महाविद्यालय त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांचे कार्यालय, औषधी भांडार होते. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्याने केंद्र सरकारने लातूरसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजूरी दिली. त्यासाठी केंद्र सरकारने १२० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. त्यात राज्य सरकारचाही ३० कोटी रुपयांचा सहभाग आहे. ३०० खाटांचे सर्व सोयींनी युक्त लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधून सज्ज झाले आणि कोरोना विषाणुचा संसर्ग सर्वत्र वाढला.
कोरोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळावे म्हणून जुलै २०२० मध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १४५ खाटांचे डेडीकेटेड कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले. या कोरोना केअर सेंटरमध्ये गेल्या ३ महिन्यांत ४ हजार ४७० कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ४ हजार ३१६ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत. डेडीकेटेड कोरोना केअर सेंटर नसते तर इतक्या रुग्णांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारावर किमान १०० कोटी रुपये खर्च झाला असता. शासकीय सेवा, सुविधा आणि व्यवस्था निर्माण केल्याने कोविड रुग्णांचे उपचारावर खर्च होणारे १०० कोटी रुपये वचवता आल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले.
पालकमंत्री अमित देशमुख यांच्यामुळेच ‘डेडीकेटेड कोरोना केअर सेंटर’ सुरु
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे येथील गांधी चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अशा सर्वसुवीधांनीयुक्त कोवीड-१९ ‘डेडीकेटेड कोरोना केअर सेंटरच्या उभारणीसाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सातत्याने संबंधीत विभागाला सूचना दिल्या. ‘डेडीकेटेड कोरोना केअर सेंटरच्या उभारणीसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या.
इतकेच नव्हे तर त्यांनी स्वत: दि ६ जुलै रोजी ‘डेडीकेटेड कोरोना केअर सेंटरला भेट देऊन ‘डेडीकेटेड कोरोना केअर सेंटरच्या उभारणीची पाहणी करुन आढावा घेतला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. अनिल मुंडे, डॉ. महादेव बनसोडे, डॉ. उमेश लाड, डॉ. मंगेश सेलुकर, डॉ. उदय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही. बी. सोनटक्के, व्ही. वाय. आवाळे, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक बी. वाय. गड्डीया, सहाय्यक अभियंता व्ही. मोहन कृष्णा, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.