19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeलातूरलातूरकरांचा विसर्जनाचा नवा पॅटर्न

लातूरकरांचा विसर्जनाचा नवा पॅटर्न

४० हजार हुन अधिक कुटुंबांनी स्वगृही केले गणरायाचे विसर्जन

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील नागरिकांनी गणेश विसर्जनानिमित्त एक नवा अध्याय रचला. स्वगृहीच श्री गणेशाचे विसर्जन करून लातूरकरांनी नवा पॅटर्न तयार केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर न पडता लातूरकरांनी स्वतःच्या घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे या महापौर विक्रांत गोजमगुंडे आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी भक्ती व श्रद्धा जपत आरोग्य आणि पर्यावरणाचीही काळजी घेतली.

यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटातच संपन्न झाला. उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्बंध घालून दिले होते. असे असतानाही लातूरकरांनी सर्व निकष पाळून शांततेत उत्सव पार पाडला. बहुतांश नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना केली होती. विसर्जना निमित्त गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी स्वगृहीच गणेशाचे विसर्जन करावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी महानगरपालिकेच्या वतीने केले होते. ज्या नागरिकांना घरात विसर्जन करणे अशक्य आहे त्यांच्यासाठी प्रभागनिहाय मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आली होती.

शहरात स्थापन करण्यात आलेल्या या केंद्रावर दिवसभर गणेश मूर्ती संकलनाचे काम सुरू होते. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तत्पर होती. संकलन केंद्रावर नागरिकांनी दिलेल्या गणेश मूर्तींचे पालिकेकडून विधीवत विसर्जन करण्यात आले. संकलन केंद्रावर जमा झालेल्या मूर्तींची संख्या पाहता महापौरांच्या व प्रशासनाच्या आवाहनास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याचे मंगळवारी सायंकाळी स्पष्ट झाले. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त सुंदर बोंदर, वसुधा फड, मंजुषा गुरमे, शैला डाके यांनी दिवसभरात प्रत्येक संकलन केद्रास भेट देवून व्यवस्थेचां आढावा घेतला.

लातूर शहरात सुमारे ५० हजार हुन अधिक कुटुंबांनी श्री गणेशाची स्थापना आपापल्या घरी केली होती. त्यापैकी केवळ १२ हजार ३२८ मूर्ती संकलन केंद्रावर दिवसभरात जमा झाल्या. सुमारे ४० हजार पेक्षा अधिक कुटुंबांनी स्वगृहीच श्री गणेशाचे विसर्जन केले. ८० टक्के मूर्तींचे विसर्जन नागरिकांच्या घरातच झाले. यातून लातूरकरांनी गणेश विसर्जनाचा नवा पॅटर्न निर्माण केला. धर्म, संस्कृती आणि श्रद्धेचे पालन करतानाच काळानुसार बदलत लातूरकरांनी हा नवा अध्याय रचला. यातून आरोग्य आणि पर्यावरणाच्या रक्षणाचीही काळजी नागरिकांनी घेतली. विशेष म्हणजे यावर्षी बहुतांश लातूरकरांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना केली होती.

लातूर शहरातील नागरिकांनी राज्यातील जनतेसाठी मार्गदर्शक असा उपक्रम राबवला. श्रद्धा जपून आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करता येऊ शकते हे लातूरकरांनी दाखवून दिले. याकामी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील पुढाकार घेतला होता. याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी लातूरकर नागरिकांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या