28.7 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home लातूर लातूरचे नाव आता आरोग्य क्षेत्रात उंचावेल - आमदार धिरज देशमुख

लातूरचे नाव आता आरोग्य क्षेत्रात उंचावेल – आमदार धिरज देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरला शिक्षणात आणि सहकारात उल्लेखनीय शहर म्हणून राज्यभर ओळखले जाते. त्याप्रमाणे येणाऱ्या काही दिवसांत लातूर हे आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय शहर म्हणून ओळखले जाईल. त्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख साहेब हे विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूरला नक्कीच वेगळी ओळख मिळेल, असा विश्वास आमदार मा. धिरज विलासराव देशमुख यांनी येथे व्यक्त केला.

मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाचा आमदार मा. धिरज देशमुख आणि सौ. दिपशिखा धिरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. 16) प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना ही लस दिली जात आहे. त्यानुसार पहिली लस आरोग्य कर्मचारी श्रीमती अनिता उत्तम गरड यांना यावेळी देण्यात आली. त्यानंतर मा. धिरज देशमुख यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मा. धिरज देशमुख म्हणाले, लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळी राज्यात केवळ 2 ते 3 प्रयोगशाळा होत्या. कोरोनाचा अहवाल येण्यासाठी 48 हुन अधिक तास लागायचे. ही बाब लक्षात घेऊन अमित देशमुख साहेबांनी जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू केली. किंबहुना, तालुका स्तरावर ते प्रयोगशाळा घेऊन गेले. आरोग्यक्षेत्रात आणि आरोग्य शिक्षणात अनेक पायाभूत सुविधा त्यांनी झपाट्याने सुरू केल्या. कोरोना काळात राज्य सरकार आणि वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असेच आहे. लातूर जिल्ह्यात चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचाही त्यांचा मानस आहे.

कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे ही तीन शस्त्र आपल्या हातात होती. आता लस हे नवे शस्त्र आपल्या हाती आले आहे. हे एक ‘सुरक्षा कवच’ आहे, असे सांगून धिरज देशमुख म्हणाले, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू झाली आहे, याचा अभिमान आहे. असे असले तरी आपल्याला आणखी काही काळ मास्क बांधणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करायचे आहे. याकडे दुर्लक्ष होऊ नये.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप दादा नाडे, ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विकास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, संचालक अमर मोरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेसाहेब सवई, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील, मुरुडचे सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, बी एस पटाडे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, हनुमंत नागटिळक, डॉ. दिनेश नवगिरे, दिपक पठाडे, रघुनाथ शिंदे, उद्धव सवासे, भारत लाड, वैभव सापसोड, निलेश फेरे, राजेंद्र मस्के, चंद्रकांत मोरे, रामा गोरे, ब्रह्मानंद जाधव, प्रताप खोसे, गोविंद घुते, समाधान गायकवाड उपस्थित होते.

जय आरोग्य कर्मचारी; जय पोलिस…
तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ हा नारा दिला होता. त्याकाळी जवान आणि किसान हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे होते. आता हा नारा आपल्याला ‘जय जवान, जय किसान, जय आरोग्य कर्मचारी, जय पोलिस’, असा करणे संयुक्तिक ठरणार आहे. कारण ‘कोरोना’रुपी युद्धाच्या काळात आरोग्य कर्मचारी आणि पोलिस यांनी स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून सेवा दिली. त्यांचा त्याग, त्यांचे कार्य याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील, अशा भावना धिरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केल्या.

“आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणायचे, ‘तुम्ही स्वप्न पहा, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची’. त्याच पद्धतीने महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. तिन्ही पक्ष समान किमान कार्यक्रम घेऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करीत आहे.”
– धिरज विलासराव देशमुख, आमदार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या