लातूर : प्रतिनिधी
येथील कृषी महाविद्यालयात ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फायकस प्रजातींच्या देशी वटवृक्षांचा एक उद्यान प्रकल्प याच्या निर्मितीचा शुभारंभ वडाची झाडे लावून करण्यात आला. या प्रसंगी सन्माननीय प्राचार्य अंगद सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, मनपा उपायुक्त मंजुषा गुरमे, डॉ. बी. आर. पाटील, भीम दुनगावे, ऋषिकेश दरेकर, वैष्णवी मोरे, आदर्श मानधने, अनुराधा मोरे, सूर्योदय बोईनवाड, लातूर वृक्ष चळवळीचे व सह्याद्री देवराई लातूरचे समन्वयक सुपर्ण जगताप यांच्या उपस्थितीत मुख्य वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी जगताप म्हणाले की, मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशी देशी वड, पिंपळ, पळस, वरुण, वृक्षांची मोठमोठी जंगले निर्माण व्हावी. रविंद्रनाथ टागोर यांना अभिप्रेत असलेल्या वृक्षांच्या सानिध्यातील शाळा, अभ्यास केंद्र निर्माण व्हावे. फक्त इव्हेंट स्वरुपात कार्य न करता येणा-या नविन पिढीला निसर्गाप्रती संवेदनशील बनवण्यासाठी कार्य करावे लागेल. मराठवाड्यातील सर्व हायवे च्या दुतर्फा वड, पिंपळ.ंिचच, गावरान आंबे यांची झाडे लावली जावीत. अन्यथा मराठवाड्यात जेथे सगळयात कमी वनक्षेत्र आहे याचे वाळंवटीकरण होणे अटळ आहे.
यावेळी पाटील म्हणाले येणा-या काळात शिक्षणातून कृतीशील कार्यक्रम राबवून पर्यावरण प्रती संवेदनशील पिढी निर्माण करणे. घनकच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे जरुरी आहे. उपायुक्त मंजुषा गुरमे यांनीही लातूर मनपा तर्फे या प्रकल्पाला सर्वोपरी सहकार्य करु म्हटले. प्राचार्य सुर्यवंशी म्हणाले मागील दोन वर्षांपासून लातूर वृक्ष चळवळ कृषी महाविद्यालयात कार्य करते. त्यामुळेच वड फायकस प्रजातींची सर्वात जास्त झाडे या परीसरात आहेत.
सह्याद्री देवराईचे शिवशंकर चापुले यांनीही मार्गदर्शन केले. सामुहिक वसुंधरेची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. सह्याद्री देवराईचे कवी अरविंद जगताप यांच्या कवितेने पर्यावरण स्वंयसेवकांत उत्साह निर्माण केला. तसेच दुर्मिळ बिया संकलन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सह्याद्री देवराई, लातूर वृक्ष चळवळ, निसर्ग प्रतिष्ठान, लातूर संस्कृती, माझं लातूर, ज्येष्ठ नागरिक संघ व कृषी महाविद्यालय या सर्व संस्थांचे सहकारी उपस्थित होते.