16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeलातूरलातूर ग्रामीण मतदारसंघात 'सरपंच परिषद' या अभिनव उपक्रमाला प्रारंभ

लातूर ग्रामीण मतदारसंघात ‘सरपंच परिषद’ या अभिनव उपक्रमाला प्रारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : हिवरे बाजार या गावासाठी सरकारच्या ज्या योजना आहेत, त्याच योजना आपल्या प्रत्येकाच्या गावांसाठी आहेत. असे असूनही ते गाव विकासाच्या बाबतीत पुढे आणि आपले मागे असे का? याचा गांभीर्याने विचार करूया. गावाचा विकास साधण्यासाठी त्यांच्यासारखी उर्जा आणि दृष्टिकोन प्रत्येक सरपंच, उपसरपंचाने बाळगावा. सरकारच्या योजनांचा नीट अभ्यास करावा. यातून आपण आपल्या भागात विकासाची साखळी निर्माण करू शकू. हाच हेतू सरपंच परिषदेचा आहे, असे प्रतिपादन आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी येथे केले.

गावांचे प्रश्न जागेवरच सोडवता यावेत म्हणून लातूर ग्रामीण मतदारसंघात ‘सरपंच परिषद’ या अभिनव उपक्रमाला आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरवात करण्यात आली. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मुरुड येथे लातूर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच यांची ‘सरपंच परिषद’ सोमवारी (ता. 2) आयोजिण्यात आली होती. याचे उद्घाटन आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले. मी केवळ आमदार म्हणूनच नव्हे तर एका सरपंचाचा नातू, एका सरपंचाचा पुत्र, एका सरपंचाचा पुतण्या या नात्याने आज तुमच्यासमोर उभा आहे, अशा भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.

आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, गावाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी जनता निवडून देते. सरपंच बनवते. त्यामुळे कायम गावाच्या विकासाचा ध्यास घ्या. गटातटाचा किंवा श्रेयाचा विचार करू नका. एकमेकांना खाली खेचण्यात शक्ती आणि वेळ वाया घालवू नका. मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवा. ‘या व्यक्तीमुळे गावाचा विकास झाला’ असे बोलले जावे. इतकी विकासकामे आपल्या हातून व्हावीत. यासाठी दूरदृष्टी बाळगा. सरकारच्या योजनांचा नीट अभ्यास करा. कालानुरूप काही शासन निर्णयात बदल झाला आहे. तो माहिती करून घेऊन योजनांची मागणी आणि त्याची मांडणी योग्य व ती निकषात बसणारी करा. त्यामुळे आपली कामे रखडणार नाहीत.

सरपंच हा गाव विकासाचा सूत्रधार असतो. गावाला दिशा देण्याचे काम करीत असतो. रस्ते, वीज या पलीकडे जाऊन काळाची गरज लक्षात घेत गावाचा विकास साधता आला पाहिजे. प्रत्येक खात्याची विकासकामे गावात आणता आली पाहिजे, यासाठी योजनांचा अभ्यास करा. शासकीय अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त न करता मागणी आणि मांडणीतील त्रुटी दूर करीत त्यांच्याकडून गावाचा फायदा करून घ्या. शासकीय अधिकारी हे विकासाचे स्टेअरिंग असतात. त्यांच्यामुळे गावाच्या विकासाचा प्रवास सुखकर होतो. हे लक्षात ठेवा. अधिकाऱ्यांनीही जनतेच्या प्रश्नांप्रति एकनिष्ठ व तत्पर असणे तितकेच गरजेचे असते, अशी अपेक्षा आमदार श्री. धिरज देशमुख यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीपदादा नाडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, विजय काळे, प्रताप पाटील, प्रकाश उफाडे, सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, मनोज पाटील, गोविंद कदम, रविंद्र काळे, सुभाष घोडके, प्रवीण पाटील, अभयसिंह नाडे, आकाश कणसे, डाॅ. दिनेश नवगिरे आदी उपस्थित होते.

लातूर तालुक्यासाठी आणले 43 कोटीची कामे
आपण आमदार म्हणून मला निवडून दिल्यानंतर गेल्या दीड वर्षात लातूर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी वेगवेगळ्या योजनांतून राज्य सरकारकडून 43 कोटी 35 लाख रुपयाची कामे मंजूर करून आणली, असा उल्लेख आमदार श्री. धिरज देशमुख यांनी केला. यावेळी उपस्थित सरपंच- उपसरपंच यांनी टाळ्यांचा कडकडाट करून आमदार श्री. धिरज देशमुख यांचे आभार मानले.

सरपंचांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद
सरपंच परिषदेला आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, पाटबंधारे, महावितरण यासह इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जागेचे प्रश्न, भूसंपादन, मावेजा, अपुरा निधी, घरकुल, पाणंद रस्ता, शाळा दुरुस्ती, पाणीपुरवठा, गावांतर्गत रस्ते, कबाले वाटप असे विविध प्रश्न सरपंचांनी आमदार श्री. धिरज देशमुख यांच्याकडे यावेळी मांडले. अनेक प्रश्नांची सोडवणूक जागेवरच झाली. उर्वरित प्रश्नांबाबत प्रत्यक्ष पाहणी करून समस्या तातडीने मार्गी लावा, असे निर्देश सरपंचासमोर अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. त्यामुळे सरपंचांचे चेहरे आनंदाने झळकले.

ई-रुपी सेवेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या