शिरुर अनंतपाळ : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या हालचाली सुरू केली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीचे १३ जुलै रोजी आरक्षण सोडत होणार आहे. यात तालुक्यातील तीन गट व सहा गणांचे आरक्षण सोडत होणार असून स्थानिक नेत्यासह इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा १३ जुलै रोजी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे तर पंचायत समितीसाठी तहसीलदार कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे.
आरक्षण सोडत तारीख जाहीर झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून तालुक्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे. दरम्यान तालुक्यात या अगोदर दोन गट तर तीन गण अस्तीत्वात होते. त्यात वाढ होऊन आता जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढले असून तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट तर पंचायत समितीचे सहा गण झाले आहेत. यात जिल्हा परिषदेचे साकोळ, येरोळ व हिसामाबाद या तीन गटाची जिल्हाधिकारी कार्यालयात तर साकोळ, राणी अंकुलगा, येरोळ, हिप्पळगाव, हिसामाबाद व हालकी या सहा गणांची तहसील कार्यालयात आरक्षण सोडत होणार आहे.
कोणते आरक्षण पडणार यांकडे लक्ष
तालुक्यात तीन गट व सहा गण असून कोणत्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये कोणते आरक्षण पडणार, हे सोडतीनंतर कळणार असले तरी मागील दोन निवडणुकीच्या वेळचे आरक्षण लक्षात घेऊन संभाव्य आरक्षणाचे इच्छुक उमेदवारांकडून आराखडे बांधले जात असून स्थानिक नेत्यासह इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास सुरू केली आह.े