लातूर : प्रतिनिधी
पक्षीमित्र महेबुबचाचा यांनी पुन्हा एकदा जखमी पारव्याला जीवनदान दिले. पक्षांविषयी आवड असणा-या दोन युवकांनी जखमी पारवा महेबुबचाचांच्या स्वाधीन केला आणि चाचांनी त्यावर घरगुती उपचार करुन त्याचा जीव वाचवला. निसर्गप्रेमी महेबुबचाचा वृक्षारोपन आणि वृक्षसंवर्धनात योगदान देत आहेत. परंतू, या वृक्षांवर येऊन बसणारे पक्षी या ना त्या कारणांनी जखमी व्हायचे. या जखमी पक्ष्यांवर उपचाराची गरज लक्षात घेता चाचांनी स्वत:च याबाबत पुढाकार घेतला.
पशुवैद्यकीय अधिका-यांच्या सतत संपर्कात असण्याचा फायदा त्यांना झाला. किरकोळ जखमी पक्ष्यांवर प्रथमोपचार करण्याचे ज्ञान आणि कौशल्य त्यांनी आत्मसात केले. त्यांच्या या कौशल्यामुळे आजपर्यंत किरकोळ किंवा गंभीर जखमी झालेल्या असंख्य पक्ष्यांवर त्यांनी यशस्वी उपचार करुन ते व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी त्या पक्ष्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. विशेष म्हणजे जे जखमी पक्षी महेबुबचाचांकडे काही दिवस राहून निघून गेले त्यापैकी काही पक्षी चाचांच्या भेटीसाठी अधुनमधून येत असतात.
एक गंभीर जखमी पारवा दोन युवकांनी दि. ७ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सूमारास महेबुबचाचा यांच्याकडे आणला. तो पारवा गंभीररित्या जखमी झालेला होता. पारव्याच्या अन्नाची पोटरी पुर्णत: फाटलेली होती. चाचांनी तो पारवा पाहिला आणि प्रयत्न करतो, असे आश्वासन त्या दोन तरुणांना दिले. पारव्याची अन्न नलिकाही फाटली होती. चाचांनी घरातील हळद घेतली आणि पारव्याच्या जखमेवर लावली व त्यास अलगद पिंज-यात ठेवले. अन्न नलिका फाटलेली असल्यामुळे त्यास एक दिवस चारा पाणी दिले नाही. दुस-या दिवशी पारव्याची जखम काही प्रमाणात भरली त्यामुळे त्यास चारा पाणी ठेवले. त्याने ते खाल्ले परंतू, ते त्याच्या जखमेतून बाहेर पडताना दिसले. त्यामुळे त्याच्यावर परत उपचार करुन त्याची दररोज काळजी घेतली. गेली सतरा दिवस चाचांनी त्यांच्या घरीच त्याच्यावर उपचार केले. वेळेवर देखभाल केल्याने तो तंदुरुस्त होत चालला आहे.
त्या दोन तरुणांनी जखमी पक्षाला दयाभावनेने उचलून चाचांकडे घरी आणून दिले. त्यामुळे चाचांनी त्याचे प्राण वाचवले. गंभीर जखमी पारव्याची जखम हळूहळू भरत आहे. तो काही दिवसांतच ठणठणीत होईल आणि पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात भरारी घेईल, असे महेबुबचाचा यांनी सांगीतले.