23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील संपूर्ण खरीप पिकाचे नुकसान

जिल्ह्यातील संपूर्ण खरीप पिकाचे नुकसान

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मागच्या जवळपास दीड महिन्यापासून लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. सुर्यदर्शन नाही, काही मंडळात अतिवृष्टीही झाली आहे. त्यात गोगलगाय आणि येलो मोझॅकच्या संकटामुळे खरीप पीक पुर्णत: वाया गेले आहे. या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने या सर्वच बाबींचे पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करावा व शेतक-यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सुचनेवरुन मंगळवारी लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने लातूर तालुक्यातील बामणी येथील प्रविण देशमुख, हरिश्चंद्र चव्हाण, व्यंकटराव माडे, श्रीपाल गोरे यांच्या शेतावर जाऊन येलो मोझॅकमुळे सोयाबीन पिकाचे होत असलेल्या नुकसानिची पाहणी केली. त्यांनतर या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांची भेट घेऊन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे व तालुका काँग्रेसचे निवेदन सादर केले. या निवेदनात आमदार देशमुख यांनी म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यात मागच्या एक ते दीड महिन्यापासून संततधार पाऊस सुरु आहे. अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्रातील खरीप पिकांचे संपुर्णत: नुकसान झाले आहे. पेरणीनंतर लगेच दमट वातावरणात गोगलगाईचे संकट येऊन सोयाबीन व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सखल भागात पाणी साचून खरिपाची पिके पुर्णत: वाया गेली आहेत. ढगाळ वातावरणात सुर्यपकाश न मिळाल्याने उंचवट्यावरील आणि निचरा होणा­-या जमीनीतील पिकांचीही वाढ खुटली आहे. आता या पिकावर येलो मोझॅकचे नवे संकट आल्यामुळे ही पिके पुर्णत: वाया गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी जेवढा पाऊस व्हायला पाहिजे होता त्या तुलनेत दीडशे ते दोनशे टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.

यात सर्वाधिक पाऊस जळकोट तालुक्यात ६७३ मि. मी. एवढा झाला आहे. तो सरासरीच्या १८२ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात औसा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४१२ मि. मी. पाऊस झाला आहे. तोही सरासरीच्या १२७ टक्के एवढा आहे. यावरुन जिल्ह्रातील एकुण पीक परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. पाऊस तर जास्त आहेच त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे फारसे सुर्यदर्शनही होत नाही. या परिस्थितीत रोगराई प्रचंड वाढलेली आहे. दमट वातावरणात उगवण झालेली कोवळी पिके गोगलगाईने नष्ट केली आहेत. पोषक वातावरण नसल्यामुळे उर्वरीत पिकाची वाढ खुंटलेली आहे. प्रारंभीच्या काळात उंचवट्याच्या जमीनीत पेरणी झालेल्या पिकांची वाढ होत होती. मात्र वातावरणामुळे या पिकांवरही नव्या संकटाने आक्रमण केले आहे. ढगाळ वातावरणात सुर्यप्रकाशाअभावी सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या पिकाची खालच्या बाजुची पाने हिरवी दिसत असली तरी शेंड्याच्या बाजुस पाने पिवळी पडली आहेत. या रोगाचा पार्दुभाव अत्यंत वेगाने पसरत असल्यामुळे सदरील पीक येण्याची उरली सुरली अपेक्षा संपुष्टात आली आहे. या परिस्थितीत शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला असून तो हवालदील झाला आहे.

आज तालुका काँग्रेसच्या पदाधिका­-यांनी लातूर तालुक्यातील बामणी येथे शेतावर जाऊन येलो मोझॅकग्रस्त पिकाची पाहणी केली आहे. त्यांनी त्याची छायाचित्रे प्रशासनाकडे सादर केली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने येलो मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावग्रस्त पिकांची पाहणी करावी. संततधार, अतिवृष्टी, गोगलगाय व येलो मोझॅकचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील एकंदरीत खरीपाचे पीक पुर्णत: वाया गेले आहे. त्यामुळे त्यासंबंधीचा अहवाल शासनाकडे सादर करुन शेतक­यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही निवेदनात शेवटी त्यांनी केली आहे. पीक पाहणी करुन निवेदन सादर करण्यासाठी गेलेल्या तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, विलास साखर कारखसान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, संचालक अनंत बारबोले, गुरुनाथ गवळी, गोविंदराव डुरे पाटील, सुभाष जाधव, परेश पवार, भालचंद्र पाटील, अंगद वाघमारे, रघुनाथ शिंदे, अनंत ठाकूर, विपीन गपाटे, सुरज वाघमारे, वाल्मिक माडे, वैजनाथ दिवटे, रावसाहेब पाटील, योगेश माडे, कल्याण ठाकूर, आत्माराम माडे, बाबा ठाकूर, सुरेश भांगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतक-यांचा सहभाग होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या