लातूर : प्रतिनिधी
आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित ९९ व्या मासिक संगीत सभेत लातूर येथील ज्येष्ठ व प्रसिद्ध गायक सुरमणी पंडित बाबुराव बोरगावकर यांचे बहारदार गायन झाले, आणि त्यांना तबला साथ संगत लातूर येथील ज्येष्ठ व प्रसिध्द तबला वादक तालमणी पंडित राम बोरगावकर यांनी केली तर संवादिनी साथ प्रसिद्ध पार्श्व गायिका मधुवंती बोरगावकर – देशमुख यांनी केली. बोरगावकर बंधुंच्या गायन आणि वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
शास्त्रीय संगीतातील रसिक वर्ग तयार व्हावा व अभिजात शास्त्रीय संगीताचे संवर्धन व्हावे या उद्देशाने सुरु असलेल्या आवर्तन मासिक संगीत सभेच्या ९९ व्या मासिक संगीत सभेत पंडित बाबुराव बोरगावकर यांनी वाचस्पती या लोकप्रिय रागाने आपल्या गायनाला प्रारंभ केला विलंबित एकतालात नीबद्ध ‘दया करो’ ही बंदिश आणि त्यानंतर तीनताल मधील प्रसिद्ध व पारंपारिक बंदिश ‘चतुर सुगर बलमा’ ही सादर केली व त्याला जोडून दृत एक तलातील अतिशय वैविध्यपूर्ण तराणा सादर केला ,यानंतर त्यांनी स्वत: तयार केलेला राग शारदा हा गायला राग अभोगी आणि राग शिवरंजनी अशा दोन रागांचे मिश्रण करून तयार केलेला अतिशय वैविध्यपूर्ण व अवघड सुरावट असलेला राग सहजतेने सादर करून रसिकांच्या मनावर आपल्या गायकीची एक वेगळीच छाप पंडित बाबुराव बोरगावकर यांनी टाकली , यानंतर बसंत बहार हा ही एक अवघड मिश्रण असलेला राग व यातील ‘अंग अंग मेहा रंग’ एकताल मधील त्यांनी स्वत: रचलेली बंदिश गायली व शेवटी भैरवी रागातील ‘जय शारदे वागेश्वरी’ ही तेवरा तालातील स्वरचित बंदिश सादर करून आपल्या बहारदार गायनाला पूर्णविराम दिला.
या सूरमणी व तालमणी बंधूंचे अनेक वर्षांपासून सुरतालातील जुळलेले ऋणानुबंध त्यांच्या गायन वादनातून प्रत्येक समेला रसिकांना याचे दर्शन घडत होते व रसिकही तेवढ्याच प्रेमाने टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक समेला दादा देत होते. पंडित बाबुराव बोरगावकर यांना प्रा. शिवकुमार उरगुंडे व प्रा. गीता शर्मा यांनी तानपुरा साथ तर बाल गायिका भक्ती पाटीलने स्वर साथ केली. या संगीत सभेला रसिकांचा भरभरून प्रतिसाद होता.