लातूर : उन्हाचा तडाखा सहन करीत असतानाच लातूर शहर व जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सायंकाळी विजांचा कडकडट, ढगांचा गडगडाटख वादळी वा-यासह अवेकी पाऊस पडल्याने त्याचा सर्वात मोठा फटका आंबा, द्राक्ष, टरबुज आदी फळ पिकांना बसला आहे. तसेच ज्वारी, काढणीस आलेले उन्हाळी सोयाबीनचेही नूकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीज पुरवठा खंडीत झाला. लातूर शहराचा पूर्व भाग दोन-तीन तास तर पश्चिम भाग संपूर्ण रात्रभर अंधारात होता. रेणापूर तालुक्यातील काळेवाडी शिवारात वीज पडून राजकुमार काळे यांचा बैल दगावला आहे.
यंदाचा उन्हाळा तसा जाचकच ठरत आहे. प्रचंड उन्ह, वाढते तापमान यामुळे जिवाची काहिली होत आहेग़ुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी काही वेळ कडक उन्ह होते. सायंकाळी ६.३५ वाजण्याच्या सूमारास शहर व जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वा-यासह पाऊस पडला. या पावसामुळे आंब्याचे मोठे नूकसान झाले. अचानक पाऊस सुरु झाल्याने व्यापारी, दुकानदारांची व नागरिकांची धांदल उडाली. वीजपुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. शहराच्या पुर्व भागात सुमारे दोन-तीन तास वीजपुरवठा खंडीत होता तर शहराच्या पश्चिम भागात रात्रभर वीज गायब होती. बाहेर पावसाच्या धारा, घरात उकाडा, डासांचा त्रास यामुळे अनेक नागरिकांना रात्रभर जागुनच काढावी लागली.
वादळी पाऊस निलंगा तालुक्यातही काही ठिकाणी पडला. औराद शहाजानीतील काहींच्या घरांवरील पत्रे उडून गेली. देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. हरंगुळ बु. परिसरात वादळी वा-यासह झालेल्या अवेळी पावसामुळे आंब्याचे नूकसान झाले. वादळी वा-यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मंदार वस्ती, विकासनगरातील काहींच्या घरावरील पत्रे उडाली. औसा तालुक्यातील नागरसोगा परिसरात जोरदार वादळी वा-यासह पाऊस झाला. वीजपुरवठा खंडीत झाला होता. उजनी येथेही पाऊस पडला. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ परिसरात पावसाने हजेरी लावली. शेतातील कडबा, कांदा पिकाचे नूकसान झाले.