24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरशेतक-यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करा

शेतक-यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करा

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्हा हा सोयाबीन, डाळ, ऊस यात स्वयंपूर्ण आहे, असे असूनही बियाणे लातूरच्या नावाचे का नाही? लातूरचा सीड ब्रँड विकसित करा. याबरोबरच पोखरा किंवा अन्य योजनांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणा-या शेतक-यांना ब्रँड अँम्बेसेडर करा व त्यांची यशोगाथा अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोचवा, अशा सूचना आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केल्या.

राज्यभरात नुकतीच पावसाला सुरवात झाली आहे. पेरण्यांची तयारी सध्या गावोगावी पहायला आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार धिरज देशमुख यांनी ‘लातूर ग्रामीण’ मधील कृषी विषयक कामकाजाचा आणि सध्या कार्यान्वित असलेल्या पोखरा व इतर योजनांचा कृषी विभागाच्या बैठकीत आढावा घेतला. शेतकरी सक्षम होणे, हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे. यासाठी योजनांची गती वाढवावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. आमदार धिरज देशमुख म्हणाले, शेतक-यांनी कष्टाने पिकवलेल्या धान्याला, फळांना इथेच बाजारपेठ मिळाली पाहिजे. तरच शेतक-यांमध्ये सुरक्षिततेची भावना तयार होईल. रेणापूर तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशीच पावले आपल्याला इतर पिकांच्या आणि फळांच्या बाबतीत टाकता येतील का, याचा विचार झाला पाहिजे.

आपल्याकडील सीताफळाला आणि टोमॅटोला सरकारने मान्यता दिली आहे. मग यावर भर देणा-या शेतक-यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. याच्या जोडीला बाजारपेठ, मार्केटिंग, प्रोसेसिंग कारखाने, फळांचा दर्जा तपासणारी यंत्रणा याबाबीही आपल्या भागात सुरु व्हायला हव्यात. कारण शेतकरी घाम गाळून आणि कर्ज काढून शेती करीत असतात. त्यांनी शेतीत काही प्रयोग करावे वाटत असेल तर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून आर्थिक सुरक्षाही दिली गेली पाहिजे. या दृष्टीने पावले टाकावीत, अशी अपेक्षा आमदार श्री. धिरज देशमुख यांनी व्यक्त केली.

पंजाबच्या धर्तीवर स्पर्धा घ्या
पशुसंवर्धन विषयक कामकाजाचा व दूध उत्पादनाच्या सद्यस्थितीचा पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या बैठकीत आमदार धिरज देशमुख यांनी आढावा घेतला. दुधाचे उत्पादन वाढावे आणि यातून शेतक-यांचे हित व्हावे यासाठी या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. याबाबत त्यांनी अधिका-यांना सूचना दिल्या. ४ जून रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात लिंग वर्गीकृत वीर्य मात्रा याचा वापर करुन कारवड निर्मिती व्हावी. उच्च प्रतीच्या वंशावळीसाठी व अधिक दुग्धोत्पादनासाठी कृत्रिम रेतन फायदेशीर असते. त्यामुळे खासगी कृत्रिम रेतन करणा-या सेवादात्यांना सहकार्य करुन कृत्रिम रेतनाचे कार्य व रोजगार निर्मिती वाढवावी. पशुसंवर्धन विभागाच्या या योजनांमध्ये सहभागी शेतक-यांसाठी पंजाबच्या धर्तीवर स्पर्धा आयोजित व्हावी, याबाबतही आमदार धिरज देशमुख यांनी यावेळी सूचना दिल्या.

ड्रॅगन विरोधात एकजूट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या