28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeलातूरमराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीस लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीस लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रास देशाच्या विकासात अलौकिक योगदान देणारे लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरसह मराठवाड्याचा विकास आणि विशेषत: रेल्वे प्रश्ना संदर्भात लोेकनेते विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात मोठे योगदान दिलेले आहे. त्याची दखल घेत लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीला लोकनेते विलासराव देशमुख रेल्वे कोच फॅक्टरी असे नाव द्यावे, अशी मागणी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना लेखी निवेदनही पाठवले आहे. तसेच लातूरकर नागरिकांनीही पंतप्रधानांना पत्र लिहावीत, व नामकरण करण्याची विनंती करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

ग्रामपंचायतचे सरपंच ते मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशा विलक्षण राजकीय प्रवासात लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात दूरदृष्टीने काम केले. रेल्वे प्रश्ना संदर्भातही ते सक्रिय होते. लातूर ते लातूर रोड नवीन रेल्वे मार्ग त्यांच्यामुळेच शक्य झाला. लातूर-कुर्डूवाडी नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांनीच पाठपुरावा केला. लोकनेते विलासराव देशमुख यांनी देशात प्रथमच मनरेगामधून निधी उपलब्ध करुन देत लातूरच्या रेल्वेची योजना पूर्णत्वास नेली. त्यांच्या या दूरगामी धोरणामुळेच लातूर येथून आज ब्रॉडगेज रेल्वे धावत आहेत.

लातूरसह शेजारील जिल्हे आणि मराठवाड्यातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होत आहे. रेल्वे सेवा निर्माण करण्यासाठी मनरेगातून निधी देण्याचा क्रांतीकारी निर्णय लोकनेते विलासराव देशमुख यांनीच घेतला होता. या निर्णयाचा दूरगामी परिणाम झाला. यातून मागास मराठवाड्याचा विकास होण्यास मदत झाली. आज जेथे प्रकल्प उभा राहिला आहे. त्या भागात रस्ते आणि विस्तारीकरणासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांच्याच पुढाकारातून उभारण्यात आलेल्या मांजरा कारखान्याने जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचे हे योगदान लक्षात घेता लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीला त्यांचे नाव द्यावे. यातून मराठवाड्यातील जनतेचा बहुमान होइल, अशी मागणी गोजमगुंडे यांनी केली आहे.

पंतप्रधानांना पाठवावीत पत्र
लोकनेते विलासराव देशमुख यांचे लातूरकरांवर आणि लातूरच्या नागरिकांचे विलासरावजी यांच्यावर अतोनात प्रेम होते. या अनुषंगाने लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीला देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. लातूरकर नागरिकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावीत. पत्र अथवा ईमेल आणि इतर उपलब्ध समाज माध्यमांतून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना लोकनेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या कार्याशी ते परिचित आहेत. त्यामुळे या मागणीची नोंद घेवून नक्कीच यास मान्यता देतील, अशी अपेक्षा माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या