रेणापूर : तालुक्यातील दवणगाव येथे ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला असून मंगळवारी (दि. १९) रात्री उशिरा चार शेतक-यांच्या शेडमधील तब्बल २ हजार १०० कोंबड्यांना पशूसंवर्धन विभागाच्या वतीने दयामरण देऊन शास्त्रोक्त पध्दतीने शेडनजीक मोठा खड्डा खोदून त्या कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
रेणापूर तालुक्यातील दवणगाव येथे बुधवारी (दि.१४) रोजी शिवाजी रंभाजी नागरगोजे यांच्या शेडमधील गावरान जातीच्या ९० दिवसांच्या ८ कोंबड्या मृतावस्थेत सापडल्या होत्या. सदरील शेतक-यांनी पशुसंवर्धन विभागाला याची माहिती दिली असता या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तर काही पक्षाचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सदरील अहवाल सोमवारी (दि. १८) रोजी सायंकाळी ७ वाजता पॉझिटीव्ह आल्यावर पशुसंवर्धन विभाग व तहसील प्रशासनाच्या वतीने मंगळवारी (दि. १९)चार शेडमधील २ हजार १०० कोंबड्यांना दयामरण देवुन शास्त्रोक्त पध्दतीने शेडनजीक मोठा खड्डा खोदून त्या कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
यावेळी तहसीलदार राहुल पाटील ,पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर.डी.पडिले, सहाय्यक आयुक्त डॉ. आर.के.पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. एच. पी गायके, डॉ. बोकशेटवार,डॉ. पोतले, डॉ. फुले, डॉ. श्रीमती पवार, गिरी , तसळकर, मिसाळ यांची उपस्थिती होती.दरम्यान तालुक्यातील अनेक शेतक-यांने शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुट-पालन व्यवसाय सुरू केला. पण दवणगाव येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटीव्हआल्याने शेतक-याचीचिंता वाढली आहे. परिणामी पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे.