28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरजिल्ह्यात १५ हजार लिटर्सने दुध संकलन घटले

जिल्ह्यात १५ हजार लिटर्सने दुध संकलन घटले

एकमत ऑनलाईन

लातूर : यंदाचा उन्हाळा काही प्रमाणात जाचकच ठरत आहे. मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत तर सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे तापमानाच्या पा-यात लक्षणिय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तापमानाचा पारा ३९ ते ४१ अंशांपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या तापमानाचा मानवी जीवनावर जसा परिणाम होत आहे तसाच परिणाम पशुधनावरही होत आहे. वाढत्या तापमानात दुभत्या जवावरांची काळजी हा चिंतेचा विषय बनला असून जिल्ह्यातील दुध संकलनही १५ हजार लिटर्सनी घटले आहे.

जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी सूर्योदयापासूनच सूर्य आग ओकत आहे. दुपारी शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उन्हामुळे वर्दळ थांबते. दुपारी तापमानाचा पारा ३९ ते ४१ अंशसेल्सिअसपर्यंत जातो. त्यामुळे जिवाची काहिली होते. घामाच्या धारा निघतात. उष्माघातासारख्या घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ३ यावेळेत कष्टाची कामे करु नये, उन्हात जात असाल तर डोक्यावर टोपी, गमजा, डोळ्यांवर गॉगल लावूनच जा, लहान मुले व ज्येष्ठांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात ५ लाख १२ हजार पशुधनाची संख्या आहे. बहुतांश शेतकरी जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. गावस्तरावर दुध संकलनाची सुविधा असल्याने अनेक पशुपालक गावातच दुधाची विक्री करतात. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे पशुधनाच्या चा-याचा प्रश्न मार्गी लागेलेला असतो. परिणामी ऑगस्ट ते जानेवारीपर्यंत जिल्ह्यात दररोज १ लाख ३३ हजार लिटर्सपर्यंत दुध संकलन हाते तर मार्चपासून उन्हाचा पारा वाढत असल्याने दुध संकलनात १५ ते १७ हजार लिटर्सची तुट येत आहे. पावसाळा सुरु झाल्यास यामध्ये अपेक्षीत वाढ होईल.

उन्हाळ्यात पशुधनाची स्वतंत्र गोठ्यात व्यवस्था करायला हवी. गोठा नसेल तर दाट सावली असलेल्या झाडाखाली पशुधनांना बांधावे. दिवसातून तीन ते चार वेळा पाण्याचे नियोजन करावे. शक्य असल्यास घास किंवा हिरवा चारा द्यावा. दुग्धोत्पादन वाढीसाठी योग्य व्यवस्थापनासोबत समतोल आहार महत्वाचा आहे. शेतक-यांनी दुभत्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे. गायीच्या पचनसंस्थेवरच गुणवत्तापूर्ण व अधिक दुग्धोत्पादन अवलंबुन असते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या