लातूर : औसा तालुक्यातील अंदोरा आणि भेटा या परिसरात झालेल्या अतिवृष्टीची आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी तत्काळ दखल घेत येथील भारत विद्यालयाजवळील दोन्ही पुलांची उंची तातडीने वाढवावी, शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत, अशा सूचना प्रशासनाला केल्या. दरम्यान, पावसामुळे शाळेत रात्री उशिरापर्यंत अडकून राहिलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
अंदोरा आणि भेटा परिसरात गुरुवारी (दि ४) दुपारपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे या दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या भारत विद्यालयातील शेकडो विद्यार्थी शाळेत अडकले. शाळेपासून अंदोरा आणि भेटा गावाकडे जाणारे दोन्ही पुल पाण्याखाली गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत घराकडे परतता आले नाही. या घटनेची तत्काळ दखल घेऊन आमदार धिरज देशमुख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्यासह सरपंच असगर पटेल (अंदोरा), सरपंच श्याम शेळके (भेटा) आणि स्थानिक पदाधिका-यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे पुलावरील पाणी ओसरल्यानंतर दोरीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोचवण्यात आले. एका आठवड्यात या भागात दोनवेळा अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते उखडले आहेत. शाळेकडे जाणा-या दोन्ही पुलांची व रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. याकडे आमदार धिरज देशमुख यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून सूचना केल्या.