लातूर : प्रतिनिधी
पंजाबमधील पठाणकोट येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले भारतीय सैन्यदलातील जवान सूर्यकांत शेषराव तेलंगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी त्यांचे सांत्वन केले. ‘आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत’, अशा शब्दांत त्यांना धीर दिला.
जवान सूर्यकांत शेषराव तेलंगे यांच्या पार्थिवावर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथे शोकाकुल वातावरणात बुधवार दि. २९ जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. देशाच्या सुरक्षेसाठी सूर्यकांत तेलंगे यांनी केलेला त्याग कायम स्मरणात राहणारा आणि तरुणांना प्रेरणा देणारा आहे. सर्व देशवासीय त्यांचे ऋणी राहतील. त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केल्या.