22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरपाच महिन्यांपूर्वी भूमिपूजन झालेल्या कामाचे आमदार रमेश कराड यांनी केले पुन्हा भूमिपूजन

पाच महिन्यांपूर्वी भूमिपूजन झालेल्या कामाचे आमदार रमेश कराड यांनी केले पुन्हा भूमिपूजन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील मौ. खरोळा येथे दि. २७ मार्च २०२२ रोजी लातूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. त्यात लातूर तालुक्यातील मौजे मुरुड अकोला- गातेगाव- कासारजवळा या रस्त्याचाही समावेश होता. परंतू, भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांनी याच कामाचे पाच महिन्यानंतर शुक्रवारी पुन्हा भूमिपूजन करुन महाविकास आघाडी सरकारकडे पाठपूरावा करुन या रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणलेले लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

लातूर जिल्ह्यातील १४९.३० किलो मीटरच्या रस्ते विकासासाठी रेणापूर तालुक्यातील मौ. खरोळा येथे ३७ पैकी २२ रस्त्यांचे भुमिपूजन दि. २७ मार्च २०२२ रोजी झाले होते. त्या समारंभास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य तथा माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, राज्याचे माजी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, आमदार अमर राजूरकर, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सावजनिक बांधकाम नांदेड मंडळाचे मुख्य अभियंता बी. एस. पांढरे, लातूर मंडळाचे अधिक्षक अभियंता सलीम शेख, सावजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. बी. निळकंठ यांची उपस्थिती होती.

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी तत्कालीन महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन लातूर ग्रामीण विधान सभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधीची विकास कामे मंजूर करुन आणली. परंतू, भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांनी नेहमीच आमदार धिरज देशमुख यांनी मंजूर करुन आलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसाच प्रयत्न त्यांनी शुक्रवारीही केला. पाच महिन्यांपूर्वीच भूमिपूजन झालेल्या मुरुड अकोला-गातेगाव-कासारजवळा रस्त्याचे भूमिपूजन त्यांनी करुन श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

एकदा भूमीपुजन झाले म्हणजे काम सुरु झाले, पुन्हा भूमिपूजन अनाकलनीय : कार्यकारी अभियंता
लातूर तालुक्यातील मुरुड अकोला-गातेगाव-कासारजवळा या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर दि. १ डिसेंबर २०२१ रोजी संबंधीत गुत्तेदारास देण्यात आली. दि. २७ मार्च २०२२ रोजी या कामाचे रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे संयुक्तरित्या भूमिपूजनही झाले. एकदा वर्क ऑर्डर दिली आणि त्या कामाचे भूमिपूजन झाले की, कामास सूरुवात झाली, असा त्याचा अर्थ असतो. परंतू, याच कामाचे शुक्रवारी पुन्हा भूमिपूजन कोणीतरी करणे हे अनाकलनीय आहे, असे लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. बी. निळकंठ यांनी सांगीतले.

श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न
ज्या विकासकामाचे शुभारंभ समारंभपूर्वक झाले आहे, त्याच विकासकामाचा शुभारंभ पुन्हा एकदा करणे म्हणजे झालेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा व प्रसारमाध्यमात प्रसिध्दी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसचे लातूरचे तालुकाध्यक्ष सुभाष घोडके यांनी विधानपरिषदेचे आमदार रमेश कराड यांच्यावर आज केली. जनता या दिशाभूल करणा-या वृत्तीला कधीच भुलणार नाही, असेही ते म्हणाले.

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या आणि महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या निधीतून सुरु झालेल्या मुरुड अकोला-कासार जवळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार रमेश कराड यांनी शुक्रवारी केला. वास्तविक, याआधीच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, तत्कालीन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, तत्कालीन राज्यमंत्री विश्वजित कदम, तत्कालीन राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत खरोळा येथे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. हे माहिती असूनही पुन्हा शुभारंभाचा घाट घालणे म्हणजे आयत्या पिटावर रेघोट्या मारण्यासारखे आहे, अशी टीका घोडके यांनी केली.

विधानपरिषदेचे आमदार कराड यांनी याआधीही अनेकदा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे श्रेय लाटले आहे. या वृत्तीकडे काँग्रेसने सुरवातीलादुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार श्रेय लाटण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र, यापुढे काँग्रेस शांत राहणार नाही. आमदार कराड यांचे अशोभनीय कृत्य आम्ही सर्वांसमोर आणणार, असेही घोडके यांनी यावेळी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या