निलंगा : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर येथील ८ जून च्या शिवसेना शाखा वर्धापन दिनाचे औचित्य साधून होणा-या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर निलंगा विधानसभेतील हलगरा व औसा विधानसभेतील कासार शिरशी येथे जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले असल्याचे आज पत्रकार परिषदेमध्ये लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, शहर प्रमुख सुनील नाईकवाडे , शहर संघटक हरिभाऊ सगरे, मुस्तफा शेख, रेखाताई पुजारी, अजिंक्य लोंढे, युवा सेनेचे अण्णासाहेब मीरगाळे , प्रशांत वांजरवाडे हे उपस्थित होते . माने म्हणाले की, मराठवाड्यातील पहिली शिवसेनेची शाखा १९८५ साली (औरंगाबाद) येथे शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये स्थापन करण्यात आली होती या शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय माजी खासदार चंद्रकांत खैरे व औरंगाबादचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी घेतला असून या वर्धापन दिनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ८ जूनला औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक सभाग्रह येथे होणा-या सभेसाठी उपस्थित राहण्याचा शब्द दिला आहे. यामुळे औरंगाबादपासून दूर असणा-या लातूर जिल्ह्यात शिवसैनिकांना व जनतेला त्रास होऊ नये या उद्देशाने उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार संतोष सांबरे यांना लातूर जिल्ह्यात सभा घेण्याचे व तेथील आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्याने खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार संतोष सांबरे यांची निलंगा विधानसभेत हलगरा येथे दि ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता तर औसा विधानसभेतील कासारशिरशी येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी प्रास्ताविक हरिभाऊ सगरे यांनी केले.