लातूर : प्रतिनिधी
बहुविद्याशाखीय शिक्षण हा बदलत्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मुख्य गाभा आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर सर्वसमावेशकता आणि एकत्रीकरणाचे मोठे आव्हान असणार आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु पंडित विद्यासागर यांनी केले. येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात ‘बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे व आव्हाने’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिसंवादात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. या परिसंवादाचे आयोजन रोटरी क्लब लातूर, श्री दयानंद शिक्षण संस्था, लातूर व जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. परिसंवादाचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी ऑनलाईन पद्धतीने केले.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील, रोटरीचे प्रांतपाल रुक्मेष जाखोटिया, प्रथम संस्था, पुणेचे प्रमुख डॉ. माधव चव्हाण, प्रा. डॉ. भूषण जोरगुलवार, प्रा. डॉ. ज्ञानदेव मोरे, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड , रोटरी क्लबचे अध्यक्ष सीए सुनील कोचेटा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी कुलगुरु पंडित विद्यासागर यांनी नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवण्याबरोबरच शिक्षकांकडेही संबंधित विषयांचे सखोल, परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्र कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. सुखदेव थोरात, रुक्मेष जाखोटिया, डॉ. माधव चव्हाण, प्रा. डॉ. भूषण जोरगुलवार, डॉ. अशोक चांडक, प्रा. डॉ. ज्ञानदेव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुनील कोचेटा यांनी केले. रमेश बियाणी, अजितसिंह पाटील यांनीही यावेळी आपली भूमिका विषद केली. सूत्रसंचालन जयप्रकाश दगडे यांनी तर आभार रोटरी क्लबचे सचिव श्रीमंत कावळे यांनी मानले.