21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरतिरुका गावाजवळील राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद

तिरुका गावाजवळील राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० चे काम गत अनेक दिवसांपासून बंद आहे. हे काम बंद असल्यामुळे तिरुका गावातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावात जाण्यासाठी तसेच गावातून रस्त्यावर येण्यासाठी योग्य रस्ते नसल्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे यामुळे रास्ता रोको करण्याचा गावक-यांनी इशारा दिला आहे .

जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ मोठी नदी आहे. या नदीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेडच्या वतीने मोठा पूल उभारण्यात आला आहे परंतु या पुलाच्या पुढील तसेच मागील काम गत अनेक महिन्यापासून बंदच आहे. सद्यस्थितीत असलेल्या पुलापेक्षा ५० ते ६० फूट उंच नवीन पूल झाला आहे. हा पूल उंच झाल्यामुळे तिरूका गावाजवळील जे बसस्थानक होते. त्या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात आला आहे. यामुळे गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी बोगदा तयार करण्यात आला आहे तसेच दोन्ही बाजूनी सर्विस रोड करण्यात आला आहे परंतु सर्विस रोडचे काम हे अपूर्ण असल्याकारणाने, बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे.

गावातील प्रत्येक नागरिकास या बोगद्यातूनच जावे लागत आहे. महिला, लहान मुले, वृद्ध , दुचाकी स्वार, या सर्वांनाच या बोगद्यातून जावे लागत आहे. या बोगद्यामध्ये घसरगुंडी झाल्यामुळे अनेक दुचाकी स्वार तसेच महिला या ठिकाणी घसरून पडले आहेत . या रस्त्याचे लवकर काम पूर्ण करणे गरजेचे असताना. याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. तसेच डोंगरगाव पाटीपासून आहे त्या रस्त्यापासून दुसरीकडे रस्ता काढण्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांचा विचार आहे. यामुळेच आता आहे त्या पुलापासून पश्चिमेकडे नवीन पूल उभारण्यात आला आहे. नवीन पूल बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे परंतु काही शेतक-यांनी हा रस्ता अडविल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूकडील काम थांबलेले आहे.

यामुळे वाहनधारकांना जुन्याच पुलावरून प्रवास करावा लागत आहे परंतु या जुन्या पुलावर मोठे खड्डे पडलेले आहेत. गुडघाभर पाणी या ठिकाणी साचून राहत आहे , या पुलाच्या दोन्ही बाजूचे कडे तुटलेले आहेत. त्यामुळे या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची डागडुजी करणेही गरजेचे आहे परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. तिरुका गावाजवळ बंद पडलेले काम तात्काळ सुरू करावे तसेच नागरिकांना जो त्रास होत आहे. तो कमी करावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण पाटील, सरपंच राजीव सगर , सोसायटीचे संचालक विनोद मदेवाड, सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील, रमाकांत मदेवाड आदीसह ग्रामस्थांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या