23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरजातीयवादाला राष्ट्रीय विचार हेच उत्तर असेल

जातीयवादाला राष्ट्रीय विचार हेच उत्तर असेल

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जात जन्माने नाही तर कर्माने निर्माण होते, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत. मनुष्य ही जात, माणुसकी हा धर्म आणि पृथ्वी हे राष्ट्र, असे सावरकर यांचे तत्व होते. परंतु आपण विशिष्ट चष्मा घालून सावरकर यांच्याकडे पाहतो. माणसाने माणसाशी माणुसकीने, प्रेमाने वागणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे, असे सावरकर सांगत असत. परंतु आता जातीयवाद वाढवला जात आहे. राष्ट्राची भावना, राष्ट्रीय विचार हेच त्याला उत्तर असेल, असे मत सिने अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यानात शरद पोंक्षे बोलत होते.दयानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘साहित्यातून राष्ट्र जागरण- बंकीमचंद्र ते सावरकर’ या विषयावर पोंक्षे यांनी विचार मांडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून बांधकाम व्यावसायिक दिलीप माने तर मंचावर भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर जोशी, सचिव अमित कुलकर्णी, डॉ.अभिजीत मुगळीकर, अमोल बनाळे, सिद्धराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी होते पण त्यांनी जाती-जातींच्या भिंती तोडण्यासाठी प्रयत्न केले. रत्नागिरी जिल्हा जातमुक्त करण्यात त्यांना यश आले होते ऋषी बंकिमचंद्र यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीतामध्ये पृथ्वीचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यात कुठल्याही देवाची महती सांगण्यात आलेली नाही. एक स्त्री आणि दुर्गेच्या रुपात पृथ्वीचे वर्णन बंकिमचंद्रांनी केलेले आहे.

परंतु हे पटवून देण्यात आपण कमी पडलो. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिलीप माने यांनी भारत विकास परिषदेच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार ऐकून रक्त सळसळते. अंदमानत गेलो असता सेल्युलर जेल पाहून सावरकर यांच्या प्रति आदरभावाने डोके टेकवल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी भारत विकास परिषदेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अभिजीत मुगळीकर यांनी प्रास्ताविक केले. भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. ऋषी बंकीमचंद्र या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. शशी देशमुख यांनी देशभक्तीपर गीताचे गायन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय अयाचित व डॉ. ऋजुता अयाचित यांनी केले. अमोल बनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत विकास परिषदेच्या व्याख्यान समितीमधील सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहरातील हजारो नागरिक, युवक-युवतींची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या