शिरूर अनंतपाळ : गावठाणाबाहेरील सर्वे नंबर गट नंबर मध्ये बांधिलेल्या घरांना अकृषी कर भरावा लागणार आहे. महसूल विभागाकडून तहसील कार्यालयाकडून संबंधित घरमालकांंना नोटिसा देण्यात येत असून या मोहिमेद्वारे सर्वे नंबरमध्ये बांधिलेल्या घरांची चाळीस पट दंडाने वसुली करण्यात येणार आहे.
गावाच्या जवळ असलेले सर्वे नंबरमध्ये आकृषी परवानगी न घेता बांधलेल्या घरांची आकारणी चाळीस पटाने दंडाची वसुली करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी निलंगा विकास माने यांनी दिले असून तहसीलदार अतुल जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावा-गावात तलाठ्यामार्फत संबंधितांना नोटीस देण्यात आले असून दंड न भरल्यास सातबाराकिंवा ग्रामपंचायत आठ अ वर बोजा चढविण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.
गेल्या काही वर्षापासून गावांचा विस्तार वाढला आहे. त्यात भूकंपानंतर गावठाणमध्ये जागा शिल्लक नसल्याने गावांजवळील सर्वे नंबर मधील शेतात मोठ्या प्रमाणात घरे निर्माण झाली आहेत. मात्र सर्वे नंबर मध्ये घरे बांधताना त्याचे एन ए करण्यात आलेले नसल्याने संबंधित शेतक-यांच्या नावावरील सातबारा वरील क्षेत्र कमी झाले नाही तर प्लॉट खरेदी करून ही त्या जागांचे एन ए न झाल्यामुळे सर्वे नंबर मध्ये घरे होऊनही ती जागा आणखीन ही मुळ मालकांच्या नावांवर आहे.
दंड माफ होणार नाही
महसूल अधिनियमानुसार एन ए झालेल्या क्षेत्रात घरे बांधणे आवश्यक आहे.मात्र तसे न झाल्याने ती घरे अकृषी कर भरण्यास बांधिल आहेत.त्यामुळे महसुल विभागाकडून गावठाणाबाहेरील सर्वे नंबर – गट नंबर मध्ये बांधिलेल्या घरांचे अकृषी कर चाळीस पट दंडाने वसूल करण्यात येणार असून कोणत्याही परिस्थीतीत दंड माफ केला जाणार नसल्याचे उपविभागीय अधिकारी निलंगा विकास माने यांनी सांगितले आहे.
अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी राज्यात पोलिसांची ‘हायवे मृत्युंजय योजना’