लातूर : माहिती अधिकारात संबंधित विभागाकडून माहिती मागून घेऊन धमकी देऊन दोन लाख रुपये खंडणीची मागणी करणा-या व्यक्तीला व सोबतच्या व्यक्तीला लातूरच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली. लातूर येथील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत मॅनेजर म्हणून तक्रारदार नोकरीवर आहेत. त्यांच्या कंपनीमार्फत लातूरतील विविध प्रशासकीय विभागास वाहनाचा पुरवठा करण्यात येतो. त्यांनी विविध विभागांना २२ गाडया, गाडयांचा ड्रायव्हर व डिझेलसह पुरवठा केला आहे.
गेल्या काही दिवसापासून माधव सूर्यवंशी या व्यक्तीने माहिती अधिकारात संबंधित विभागाकडून माहिती मागून घेऊन तक्रारदार व त्यांच्या मालकांना तुम्ही गाडयांचे किलोमीटर, रनिंग कमी जास्त करता. तुम्ही जीएसटी भरत नाहीत. तुमच्या गाडयांची सर्व माहिती मी माहिती अधिकारात मागून घेतलेली आहे. मी तुमची बिलं निघू देणार नाही. तुमच्या गाडया चालू देणार नाही. तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना जीवानिशी ठार मारू, आमची गँग तुम्हाला जगू देणार नाही अशी धमकी देऊन दोन लाख रुपये खंडणीची मागणी करीत आहेत अशी तक्रार पोलीस ठाण्यास दिली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कदम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळ, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, सहायक पोलीस निरीक्षक दयानंद कदम, पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस अमलदारांचे पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अमलदारांना सूचना व मार्गदर्शन केले.
माधव सूर्यवंशी याने तक्रारदारास खंडणीची रक्कम घेऊन जिल्हा परिषद लातूर येथील आवारात बोलविल्याने दि. १८ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजण्याचे सुमारास पथकाने पंचासहित जिल्हा परिषदच्या आवारात सापळा लावला. थोडयाच वेळात तक्रारदाराकडून खंडणीची रक्कम घेत असताना माधव सूर्यवंशी व त्याचा सहकारी सचिन आकनगिरे यांना खंडणीच्या रकमेसह जिल्हा परिषदेच्या आवारातील रजिस्ट्री ऑफिस समोरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून खंडणी म्हणून घेतलेली रक्कम जप्त करण्यात आली असून या सर्व घटनेची रेकॉर्डिंग करण्यात आलेली आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माधव आबाजी सूर्यवंशी (३६ माहिती अधिकार कार्यकर्ता, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, एलआयसी कॉलनी, लातूर), सचिन उर्फ गोवर्धन चंद्रकांत आकनगिरे (३६ व्यवसाय ग्राहक सेवा केंद्र, रा. स्वराज्य नगर, लातूर) यांचे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड हे करीत आहेत.