लातूर : प्रतिनिधी
एकविसाव्या शतकात वावरत असतानाही बँकेच्या कामकाजाबद्दल म्हणावी तितकी माहिती नसते. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नेमकी हीच गरज ओळखून दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या बँकिंग अँड इन्शुरन्स कमिटीच्या वतीने बँक कामकाजाचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात एक दिवसाची बँक साकारत बँक कामकाज प्रात्यक्षिकासह दाखविले. या प्रदर्शनाचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव रमेश बियाणी, प्राचार्य डॉ. राजाराम पवार, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बालाजी कांबळे, बँकिंग अॅड. इन्शुरन्स कमिटीचे समन्वयक प्रा.निखील व्यास आदींची उपस्थिती होती. बँकेत पैसे कसे जमा करायचे, बँकेतून पैसे कसे काढावेत, बँकेच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार कसा करावा, एनईएफटी-आरटीजीएस कसे करावे, चेक आणि त्याचे व्यवहार कसे करावेत, युपीआयच्या माध्यमातून इतर व्यक्तींच्या खात्यावर पैसे कसे पाठवावेत, किती प्रकारचे लोन असतात आणि लोन घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे.
बँकिंग लोकपाल, आरबीआय बँकेचे कार्य, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड याबद्दल विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांसह यावेळी माहिती दिली. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांनी प्रदर्शनाला भेट देऊन बँकिंग कामाबद्दल सखोल माहिती जाणून घेतली. लक्ष्मीरमण लाहोटी आणि रमेश बियाणी यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निखिल व्यास यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगेश शर्मा यांनी तर आभार प्रा.अक्षय पवार यांनी मानले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रा.निखिल व्यास, प्रा.निकिता अग्रवाल, प्रा. योगेश शर्मा, प्रा.अक्षय पवार, प्रा. अजय चव्हाण, प्रा. लता जाधव, प्रा. अनुजा कांबळे आदींनी परिश्रम घेतले.