लातूर : केंद्र सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात किसान संघर्ष समन्वय समिती, दिल्ली यांच्या समर्थनात पूर्ण भारत देश दि. ८ डिसेंबर रोजी बंद होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार लातूर जिल्हा काँग्रेस, लातूर शहर जिल्हा काँग्रेस बंदमध्ये सहभागी झाली. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, किसान संघर्ष समन्वय समिती, स्वाभीमानी शेतकरी संघटना, सीपीएम, आम आदमी पार्टी आदी पक्ष संंघटनांनी केलेल्या आवाहनाला लातूरकरांनी उत्स्फु र्तपणे सहभागी होत शंभर टक्के बंद पाळला.
शेतक-यांच्या हक्कासाठी संपूर्ण देशभर आंदोलन सुरु आहे. लातूर बंदची हाक देण्यात आल्याने मंगळवारी सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ बंद होती. विशेष म्हणजे व्यापारी बाजारपेठ उघडायला आलेलेच नव्हते. त्यामुळे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मार्केट यार्ड, गंज गोलाई, मेन रोड, हनुमान चौक, सुभाष चौक, सम्राट चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, डॉ. आंबेडकर चौक, स्वामी विवेकानंद चौक, गरुड चौक, जुना गुळ मार्केट चौक, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक, औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, लोकमान्य टिळक चौक, गांधी चौक यासह संपुर्ण बाजारपेठ बंद होती. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स, पान टप-या, चहाच्या टप-या कडकडीत बंद होत्या.
दुचाकीवर फिरुन कॉंग्रेसने केले बंदचे आवाहन
भारत बंदच्या समर्थनार्थ लातूर जिल्हा व लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सक्रीय सहभागी होत शांततेत बंद पाळावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. बंददरम्यान संपूर्ण शहरभर दुचाकीवरुन फेरफटका मारीत बंद पाळण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. नागरिकांनीही त्यास मोठा प्रतिसाद दिला.
सोलापूर शहर जिल्ह्यात बंदला प्रतिसाद