लातूर : प्रतिनिधी
वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज ओळखून वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली. मंगळवारी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी मागील वर्षी आणि त्यापूर्वी लावलेल्या वडाच्या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून झाडे लावा, झाडे वाचवा असे आवाहन करण्यात आले. यानिमित्ताने वृक्ष लागवड अन् संवर्धनासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचा निर्धार केला असून, या पावसाळ्या ‘एक व्यक्ती-एक वृक्ष’ हे अभियान व्यापक पध्दतीने राबविण्यात येणार आहे.
मंगळवारी लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लातूर शहरात वडाच्या झाडांची संख्या कमी असल्याने अक्षरश: महिलांना पूजेसाठी झाड शोधावे लागायचे. ही बाब लक्षात घेऊन वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडांची लागवड करून सदर झाडे संवर्धनासाठी महिलांना दत्तक देण्यात आली. महिलांनीही वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी पुढाकार घेत या कार्यात योगदान दिले आहे. गतवर्षी आणि त्यापूर्वी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या वडाच्या झाडांचा मंगळवारी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी झाडांना फुगे बांधून ‘हॅपी बर्थडे टू ट्री’ असा नारा देण्यात आला. या उपक्रमात सावंत-माधव अपार्टमेंट येथील रहिवासी नागिनी बिराजदार, संगीता कल्लुरे, एस. बी. साळुंके यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, कार्यकारी प्रमुख अमोल स्वामी, वृक्ष लागवड-संवर्धन-जनजगारण अभियान प्रमुख राहुल माशाळकर, वृक्षमित्र रोहित पवार आदींची उपस्थिती होती.
वृक्ष लागवड आणि संवर्धन ही लोकचळवळ व्हावी यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहे. नाविन्यपूर्ण आणि नवखे उपक्रम राबवून प्रतिष्ठानने वृक्ष लागवड आणि संवर्धन ही चळवळ घराघरात नेली आहे. झाडांचा वाढदिवस, झाडाचा गणपती, पर्यावरण पूरक सण आणि उत्सव, खिळेमुक्त झाड अभियान आदींसह अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या पावसाळ्यात ‘एक व्यक्ती-एक वृक्ष’ हे अभियान राबविण्यात येणार असून, प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्या झाडासोबत स्वत:चा सेल्फी घ्यावा आणि तो सेल्फी घेतलेला फोटो सोशल मीडियावर अपलोड करावा असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानने केले आहे. या अभियानाला मंगळवारी सुरुवात करण्यात आली.
आपल्या देशात अनेक पर्यावरण पूरक झाडांची अक्षरश: खाण आहे. हळूहळू सर्वच क्षेत्रात पाश्चिमात्य संस्कृती पाय पसरत आहे. अनेकजण स्वदेशी झाडे सोडून परदेशी झाडे लावत आहेत. मात्र, काही झाड पर्यावरण दृष्टीने हानिकारक आहेत. पाश्चिमात्य संस्कृती आता झाडांमध्येही पहावयास मिळत आहे. भारतात वड, पिंपळ, कडुनिंब, अर्जुन, हेळा, भावा अशी अनेक पर्यावरणपूरक आणि इतर फळझाडे असताना उगाच शो करणारी शोभिवंत झाडे लावण्याकडे अनेकांचा कल दिसतो आहे. त्यामुळे स्वदेशी झाडांची लागवड करणे आवश्यक आहे, अशी माहिती वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी या अनुषंगाने बोलताना दिली आहे.