किल्लारी : प्रतिनिधी
शिक्षण घेत असताना कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षण घेऊ शकले नाहीत. अशा वंचित विद्यार्थ्यांसाठी आणि वेगवेगळया क्षेत्रातील नोकरदार, व्यवसायिक, उद्योजक, गृहिणी, ड्रायव्हर अशा सर्वांसाठी मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र एक महत्त्वाची संधी आहे. मुक्त विद्यापीठाचे शिक्षण घेऊनही अनेक क्षेत्रात वेगवेगळया महत्वपूर्ण पदावर अनेक विद्यार्थी असल्याचे मत डॉ. संग्राम मोरे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ बीए तृतीय वर्ष विद्यार्थ्याला निरोप समारंभ प्रसंगी डॉ. मोरे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. पी कांबळे हे होते. मंचावर डॉ. हनमंत पवार, डॉ. दैवशाला नागदे, प्रा. डॉ. बी.व्ही पवार, अभ्यास केंद्र सहाय्यक नितीन कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी तीन वर्ष केंद्र संयोजक पदाचा पदभार सांभाळून कार्यमुक्त झालेले डॉ. हनमंत पवार तसेच पुढील तीन वर्षासाठी केंद्र संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. दैवशाला नागदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक गायकवाड यांनी केले. तर आभार डॉ. डी. एस नागदे यांनी मानले. यावेळी कार्यालय प्रमुख जी. आर सरवदे, ग्रंथपाल डॉ. विक्रम गिरी, विनोद नारंगवाडे, सतीश शेळके, सुग्रीवा आकुलवाड, डॉ. ज्ञानदेव राऊत, डॉ. डी.एन भोयर यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.