लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने लातूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला दिले आहे. त्यामुळे आता ऑक्सिजन वापरावर आरोग्य विभागाचा वॉच राहणार असल्याने ऑक्सिजनच्या गैरवापरावर निर्बंध येणार आहेत.
खाजगी रुग्णालयातील ऑक्जिनच्या वापराची पडताळणी करण्याचे, भरणा केंद्रावर देखरेख ठेवण्याचे आणि सर्व रुग्णालयांना प्रतिदिन किती ऑक्जिनची गरज आहे, याची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. आवश्यकतेपेक्षा तिप्पट रुग्णांना ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. याचाच अर्थ त्याचा गैरवापर केला जात असल्याचे आरोग्य विभागाने आदेशात नमुद केले आहे. लातूर जिल्ह्याला वैद्यकीय कारणासाठी प्रतिदिन १३ किलो लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असून २६ किलो लिटर पुरवठा प्रतिदिन होतो आहे.
लातूर जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांची संख्या सर्वाधिक आहे. बहुतांशा रुग्णालयांनी कोविड केअर सेंटर्स सुरु केलेले आहेत. रॅपिड अँटिजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढविल्याने कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या रुग्णांवर सरकारी रुग्णालयांत उपचार केले जात आहेत. शिवाय खाजगी रुग्णालयांतही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी भरती होत आहेत. रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढलेली दिसून येत आहे.
लातूर जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्येमुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झालेली आहे. खाजगी आणि सरकारी रुग्णालयांतील ऑक्जिनवरील रुग्ण आणि प्रतिदिन वापरला जाणारा ऑक्सिजन यात ब-याचदा तफावत दिसून येत आहे. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांसह सरकारी, जिल्हा परिषद व महापालिका रुग्णालयाला ऑक्सिजनची किती गरज आहे. याची एकत्रीत माहिती देण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. जी रुग्णालये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर करीत आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
जिल्ह्याला प्रतिदिन १४ जम्बो सिलिंडर ऑक्सिजन
लातूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांना आरोग्य सेवा देणा-या विविध ३२ शासकीय संस्थांमधून आजघडीला एकुण ४ हजार ६९० बेड्स आहेत. त्यापैकी १ हजार ५३० ऑक्सिजनेटेड बेड्स आहे. जिल्ह्याला प्रतिदिन १४ जम्बो सिलिंडर ऑक्सिजन लागते. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे सूरु असल्याचे लातूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगीतले.
आरोग्य विभागाचे आदेश
* ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या विचारात घेऊन त्याचा वापर योग्य रितीने केला जात आहे का याची पडताळणी करण्याच्या सूचना.
* सर्वसाधरण कक्षातील रुग्णाला ७ लिटर प्रतिमिनीट आणि अतिद क्षता कक्षातील रुग्णाला १२ लिटर प्रतिमिनीट याप्रमाणे खाजगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जात आहेत का याचे लेखापरीक्षण.
* अतिरिक्त शुल्क आकारणीसाठी खाजगी रुग्णालयात आवश्यकतेपेक्षा अधिक काळ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात येत असल्याची शंका असल्याने विशेष देखरेख ठेवण्याचे आदेश.
* ऑक्जिनचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि वितरीत केलेल्या ऑक्सिजनची योग्य रीतीने नोंद करण्यासाठी ऑक्सिजन भरणा केंद्रांवर महसूल अधिका-यांनी देखरेख ठेवावी.
अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान