27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeलातूरभूजल पातळी वाढीसाठी लोकसहभागातून उपाययोजना

भूजल पातळी वाढीसाठी लोकसहभागातून उपाययोजना

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जलसंकट टाळण्यासाठी अटल भूजल योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. यामाध्यमातून भूजल संवर्धनसाठी जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासह जलसाक्षरतेवर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा योजनेच्या जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे दिल्या. तसेच भूजल पातळी वाढीसाठी लोकसहभागातून उपाययोजना करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित अटल भूजल योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा योजनेच्या जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समितीचे सहअध्यक्ष अभिनव गोयल, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे जलसंधारण तज्ज्ञ रमेश पेटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यावेळी उपस्थित होते. यावेळी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली.

लातूर जिल्ह्याने यापूर्वी भीषण जलसंकटाचा सामना केला असून पाण्याचे महत्व येथील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. भविष्यात जलसंकट निर्माण होवू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात भूजल संवर्धन आणि जलस्त्रोतांच्या बळकटीकरणावर भर देण्याची गरज आहे. अटल भूजल योजनेसाठी जिल्ह्यातील अतिशोषित, शोषित आणि अंशत: शोषित अशा १३५ गावांची निवड करण्यात आली आहे. केंद्र शासन व जागतिक बँकेच्या सहकार्य आणि लोकसहभागातून ही योजना राबविली जाणार असून यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी एकत्र येवून समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले.
उपलब्ध पाण्याचा योग्य वापरासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. अटल भूजल योजनेचे भूजल मित्र आणि कृषी विभागामार्फत शेतक-यांना सिंचन पद्धतीविषयी मार्गदर्शन करावे. पर्जन्यमान कमी असलेल्या भागात कमी पाण्यावर येणा-या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करावे. यासाठी अशा पिकांची प्रात्याक्षिके आयोजित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. पुढील पिढीला शाश्वत भूजल देण्यासाठी अटल भूजल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असून लोकांमध्ये याविषयी जाणीव जागृती करून लोकसहभागातून भूजल संवर्धनाचे उपक्रम हाती घ्यावेत, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यावेळी म्हणाले.

सन २०१३ मध्ये भूजल सर्वेक्षण यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार अतिशोषित, शोषित आणि अंशत: शोषित गावांची निवड अटल भूजल योजनेसाठी करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील १३५ गावांमध्ये ही योजना राबविली जात आहे. मागणी व पुरवठा व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करुन भूजल साठ्यात शाश्वतता आणणे, गुंतवणुकीच्या अभिसरणातून जलसंधारणासोबतच भूजल पुनर्भरणाच्या कामांना प्राधान्य देणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करुन भूजल वापर मर्यादित करणे आणि सिंचन व्यवस्थापनात सुधारणा आणणे, हे अटल भूजल योजनेचे उद्दिष्ट असल्याचे पेटकर यांनी यावेळी म्हणाले. तसेच या योजनेविषयी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करणारा लातूर हा पहिलाच जिल्हा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी प्रशांत माने यांनी यावेळी कमी पाण्यावर येणा-या शेतपिकांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन नाईक यांनी केले. दीपप्रज्वलन आणि कलश पूजनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अटल भूजल योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, भूजल मित्रांना ओळखपत्रांचे वाटप आणि योजनेच्या अनुषंगाने आयोजित विविध स्पर्धांमध्ये बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या