22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील वृक्ष लागवड आता लोकचळवळ व्हावी

लातूर जिल्ह्यातील वृक्ष लागवड आता लोकचळवळ व्हावी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे, हाही नागरिकांना प्रत्यय आलेला आहे, वृक्ष लागावडीसाठी प्रयत्न केल्यापेक्षा जास्तीचा नागरिकांमधून सहभाग मिळत आहे, याचं श्रेय नागरिकांचेच आहे, लोकांनी या गोष्टीला स्वीकारले आहे. लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड करणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे वृक्ष लागवड आता लोकचळवळ व्हावी, अशी
अपेक्षा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासनाकडून व नागरिकांच्या सहभागातून मांजरा नदीकाठावर दहा किलो मीटरपर्यत वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड येथे वृक्ष लागवडीचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, माजी आमदार पाशा पटेल, उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसीलदार स्वप्निल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव निवृत्ती, गट शिक्षण अधिकारी संजय पंचगले, माजी सरपंच शांताबाई मुळे, उपसरपंच विकास बेद्रे, ग्रामसेवक खंडु कलबोने, तलाठी वांगवाड, केंद्र प्रमुख हुसेन शेख, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोसले आदिंची उपस्थिती होती. प्राथमिक शाळा कासारखेडा, चिकलठाणा, बामणी, प्रशाला भातांगळी, श्रीराम विद्यालय कासारखेडा, जय भवानी विद्यालय बामणी, मातृभूमी विद्यालय भातांगळी या शाळेतील सर्व शिक्षक भातांगळी येथे तसेच प्राथमिक शाळा खुलगापूर, मळवटी, कासारगाव, कोळपा, हनमंतवाडी, सकपाळनगर, भातखेडा, छत्रपती शिवाजी विद्यालय मळवटी, राजमाता सुशीलादेवी विद्यालय महाराणा प्रतापनगर या शाळेतील सर्व शिक्षक भातखेडा यांचा सहभाग होता.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातच नव्हे, तर राज्यात लातूरचे ०.६ टक्के वनाच्छादित आहे. वनाचं क्षेत्र सरासरी ३३ टक्के इतके असणे आवश्यक आहे. लातूरचा इतिहास असा आहे की, लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा प्रशासन, नागरिक, संस्था, ग्रामपंचायत तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने याही वर्षी लागवड करण्यात येत आहे.

वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज समजून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यातील नागरिकही याबाबतीमध्ये जागरुक आहेत. या वृक्ष लागवडीसाठी नागरिकांतून सहभाग प्रोत्साहन मिळत आहे, ही छोटी चळवळ असून अविरतपणे सुरु ठेवणार आहोत. तसे आपल्या जिल्ह्यात नागरिकांत जनजागृती आहे. जेथे झाडे रुजवली जातात, तिथे झाडे जगवली जातात, वाढती पर्जन्यवृष्टी, वृक्षांनी सजवा सृष्टी, झाडे लावा, झाडे जगवा या घोषवाक्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणा देत वृक्षदिंडी काढली

लातूर तालुक्यातील भटखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु. ), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या चौदा गावात वृक्ष लागवड करण्यात आली. राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, त्रिपुरा महाविद्यालय, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, चन्ना बसवेश्वर महाविद्यालय, कै. व्यंंकराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, जयक्रांती महाविद्यालय लातूर, केशवराज विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, कमाला नेहरु विद्यालय, बोरी, शिवाजी महाविद्यालय, शिवणी बु., राजर्षी शाहू विद्यालय, बोरी यांनी वृक्षलगवडीत सहभाग घेतला. ग्रीन लातूर वृक्ष टीम, आर्ट ऑफ लिव्हिंग, आधार फाऊंडेशन, लातूर वृक्ष चळवळ, आम्ही मावळे शिवबाचे, रोटरी मिडटाऊन, लातूर सायकलिस्ट क्लब, वसुंधरा प्रतिष्ठान या विविध संस्थानी उत्स्फूर्त सहभाग घेवून इतरांनाही प्रेरीत केले.

भातखेडा येथे सुरुवात करुन भांतगळी फाटा, रमजानपूर, उमरगा, धनेगाव, सलगरा, बोकनगाव त्यानंतर बिंदगीहाळ या गावात जाऊन वृक्ष लागवड करुन विद्यार्थी, शिक्षक आणि विविध स्वयंसेवी संस्था, त्या त्या गावचे नागरिक यांना भेटून या अत्यंत महत्वाच्या कार्यात सहभाग घेतल्या बद्दल आणि या पुढेही हे झाडे जगवणार आहात या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत, इथून पुढेही प्रशासनाचे या कामावर लक्ष राहिल, अशी भावनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी गावोगावी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या