23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूर‘दिशा’मुळे गरीब मनीषाला मिळाले नवे आयुष्य, नवी दृष्टी

‘दिशा’मुळे गरीब मनीषाला मिळाले नवे आयुष्य, नवी दृष्टी

एकमत ऑनलाईन

लातूर : मोलमजुरी करून कुटुंबातल्या सदस्यांची पोटं भरायची आणि रोजचा दिवस ढकलायचा, अशी परिस्थिती असलेल्या कुटुंबात एखाद्याला आजारपण यावे अन् त्याच्या जीवाला धोका निर्माण व्हावा आणि कुणी तरी देवासारखे येऊन त्यांना आधार देत त्यांचा जीव वाचवावा. अशी एखाद्या शोकांतिकेच्या कथानकाला साजेशी घटना लातुरातसमोर आली आहे. दिशामुळे एका गरीब तरुणीला नवे आयुष्य, नवी दृष्टी मिळाली.

परभणी जिल्ह्याच्या इळेगावातील शेतमजूर कुटुंबातील १७ वर्षीय तरुणी तापाने फणफणली. घरातल्या गरिबीमुळं पालकांनी प्राथमिक उपचार केले. मात्र तेवढ्याने काहीच झाले नाही. यात दीड महिना गेला ताप मुलीच्या डोक्याला भिनला. मेंदूत ट्युमर तयार होऊन तिची दृष्टी गेली, जीवाला धोका निर्माण झाला. अशा वेळी लातूरच्या दिशा प्रतिष्ठानने या कुटुंबाला व तरुणीला आधार देत तिच्या उपचाराचा खर्च उचलला आणि तिला केवळ दृष्टीच नाही, तर आयुष्य पुन्हा नव्याने मिळाले. परभणीच्या इळेगाव (ता. गंगाखेड) येथे अंकुश धापसे हे पत्नी शांता यांच्यासह शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

दीड महिन्यापूर्वी त्यांची १७ वर्षीय मुलगी मनीषा हिला ताप आला. सुरुवातीला प्राथमिक उपचार केले, मात्र त्याने फरक पडला नाही. तेव्हा २० हजारांचे कर्ज काढून तिला परभणी आणि नांदेड येथे उपचारासाठी नेले. मात्र तरीही मनीषाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यात दीड महिन्याचा काळ गेला. ताप मनीषाच्या मेंदूला भिनला आणि मेंदूत ट्युमर तयार झाला. मेंदूतील रक्तवाहिन्या सुकून तिची दृष्टी गेली.

आता हा आजार तिच्या जीवावर बेतणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, लातुरात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या व मूळचे इळेगावचे असलेल्या गंगाधर पवार यांना गावी गेल्यानंतर ही घटना समजली. त्यांनी मनीषाला लातूरला आणण्याचा सल्ला तिच्या पालकांना दिला. १५ जुलैला तिला लातुरात आणल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉ. हनुमंत किणीकर यांच्याकडे उपचार सुरु केले. मात्र डॉक्टरांनी सांगितलेला खर्च या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा होता. डॉक्टरांनी तिला मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

मात्र मुंबईविषयी काहीच माहिती नसल्याने ते असमर्थ होते. ही बाब दिशा प्रतिष्ठानच्या अ‍ॅड. वैशाली यादव व नगरसेविका श्वेता लोंढे यांना समजली. त्यांनी दिशा प्रतिष्ठानचे प्रवर्तक अभिजीत देशमुख यांना याची कल्पना दिली. सर्वांनी मिळून रुग्णालयात जाऊन मनीषा व तिच्या नातेवाइकांची भेट घेत परिस्थिती समजून घेतली. उपचाराचा खर्च आपण उचलणार असल्याचा शब्द त्यांनी मनीषाच्या कुटुंबीयांना दिला. डॉक्टरांनीही आपल्याबाजूने सहकार्याचा शब्द दिला. त्यानुसार सह्याद्री हॉस्पीटलमध्येच डॉक्टरांनी मनीषावर उपचार सुरु केले. ऑपरेशनच्या वेळी रक्ताची गरज भासली, त्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने मदत केली. डॉक्टरांच्या उपचाराला आणि सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि मनीषाची गेलेली दृष्टी तर परत आलीच; मात्र जिवावर बेतलेले हे संकट टळून तिला नवे आयुष्य मिळाले.

देश प्रथम, नेहमीच प्रथम!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या